
आगामी निवडणुका, पक्षसंघटन वाढीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
चिपळूण : चिपळूण तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली होती. तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच पक्षसंघटन वाढीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
सकाळी साडेअकरा वाजता झालेल्या या बैठकीला तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेवक सुधीर शिंदे, माजी नगरसेवक कबीर काद्री, माजी नगरसेवक करामत मिठागरी, माजी नगरसेविका सफा गोठे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी तालुकाध्यक्ष जीवन रेळेकर, वासुदेव सुतार, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत, जिल्हा उपाध्यक्ष गुलजार कुरवले, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत फके, जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी भुस्कुटे, चिपळूण तालुका काँग्रेसचे सचिव शमून घारे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, उपाध्यक्ष मैदनुद्दीन सय्यद, युवक काँग्रेसचे क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, मनोज दळी, रत्नागिरी जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष रवीना गुजर, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम, सेवालदलचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक निवाते, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह, नंदकुमार कामत, काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव चव्हाण, अशोक भुस्कुटे, विनायक जाधव, संजय शिगवण, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, संगीता लोटे आदी उपस्थित होते.
या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत रणनिती आखण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने संघटन अधिक प्रभावी करण्यासाठी नगरपालिका क्षेत्रासह जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय मंडळ समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबाजवणी करण्याचे निर्देश प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष मा. आ. नानाभाऊ पटोले यांनी दिले आहेत. त्यानुसार मंडळ समित्या स्थापनेबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. 9 ते 15 ऑगस्ट या दरम्यान काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेच्या नियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
`राष्ट्रवादी`शी आघाडीबाबत अनुकूल
दरम्यान, या बैठकीत आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शविली. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसशी लवकरच चर्चा केली जाणार आहे. तसा निरोप बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला कळविण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह यांनी दिली.














