प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा निषेधचिपळूण : काँग्रेसच्या नेत्या आणि उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. चिपळूणमध्येही या घटनेचे पडसाद उमटले. काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सोमवारी शहरातील मच्छीमार्केट परिसर आणि नगरपालिकेसमोर भर पावसात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इब्राहिम दलवाई, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस सोनललक्ष्मी घाग, उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, नगरसेवक, करामत मिठागरी, कबीर काद्री, नगरसेविका सफा गोठे, काँग्रेसचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य गुलजार कुरवले, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष शकील तांबे, तालुका उपाध्यक्ष साजिद सरगुरोह, युवक काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते यश पिसे, शहराध्यक्ष फैसल पिलपिले, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा श्रद्धा कदम, विद्यार्थी काँग्रेसच्या शहराध्यक्षा गौरी हरधारे, रऊफ गोठे, अश्विनी भुस्कुटे, बरकत पाते, वहाब सुर्वे, आशिक हमदुले आदींनी सहभाग घेतला.
प्रियंका गांधी लखीमपूर खेरीला दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना भेटण्यासाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचा हात धरत धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र, आज पहाटे साडेपाचच्या सुमारास प्रियंका गांधी यांना हरगाव परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रियंका गांधींचे कपडे ओढले आणि त्यांचा हात पोलिसांनी मुरडल्याचा आरोप उत्तर प्रदेश काँग्रेसने केला आहे. या घटनेचे पडसाद देशभर उमटले. चिपळुणातही काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शहरातील मच्छीमार्केट परिसर आणि नगरपालिकेच्या समोर काँग्रेसने आंदोलन केले. ‘वक़्त बदलाव की आंधी का है… वक़्त प्रियंका गांधी का है’, ‘गली गली में शोर है, योगी सरकार चोर है’, ‘योगी सरकार हाय हाय’ अशा जोरदार घोषणा देत काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी तीव्र निषेध केला. योगी सरकारविरोधी यावेळी संताप व्यक्त करत आपला लढा सुरूच ठेवणार, असा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानी दिला आहे.














