
रत्नागिरी, (आरकेजी) : सकल मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर आज चिपळूण तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. चिपळूणसह, बहादूरशेख, खेर्डी बाजारपेठ आणि परिसरात बंद पाळण्यात आला. बंदमुळे चिपळूण आगारातील एसटी सेवा सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4.30 पर्यंत बंद होती. एसटी सेवा खंडीत झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. अनेक प्रवाशी एसटी आगारात ताटकळत होते.
मराठा समाजाची आरक्षणाची मागणी तसेच गोदावरी नदीत काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतल्याने शासनाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती. चिपळूण तालुक्यातही मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. चिपळूण, बहादूरशेख आणि खेर्डी परिसरात संपूर्ण बाजारपेठा बंद होत्या. सकाळ सत्रात एसटी सेवा खंडित झाल्याने शाळांमधून विद्यार्थ्यांना लवकर सोडण्यात आले.