चिपळूण : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त काँग्रेसतर्फे राज्यभर 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आझादी गौरव पदयात्रा काढली जात आहे. शनिवार, दि. 13 ऑगस्ट रोजी चिपळुणात ही पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात काँग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांचे स्मरण करण्यासाठी ही पदयात्रा आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव प्रेरणादायी असून तिरंगा काँग्रेससाठी सन्मान आणि प्रेरणा आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने देशाला महासत्ता बनवण्याचे काम केले. स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेसचा सर्वांत मोठा वाटा आहे, ही बाब आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेसची विचारधारा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचवण्याचे काम केले जाईल, अशी माहिती प्रशांत यादव यांनी दिली.
चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून सकाळी 10.30 वाजता आझादी गौरव पदयात्रेला सुरुवात होईल. चिंचनाकामार्गे ही पदयात्रा नगरपालिकेजवळ जाईल. तिथे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा बाजारपेठमार्गे गोवळकोट रोडपर्यंत जाईल. तिथे कमानीजवळ या पदयात्रेचा समारोप होईल. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार हुसैनभाई दलवाई, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, निरीक्षक मा. गुलाबराव घोरपडे, जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते, काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक सेल व इतर सेल व विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी होणार आहेत, अशी माहितीही प्रशांत यादव यांनी दिली. या पदयात्रेत चिपळूण शहर आणि तालुक्यातील सर्व काँग्रेसप्रेमींनी सहभागी व्हावी, असे आवाहन प्रशांत यादव केले आहे.