
ठाणे : हिंदमाता विद्यालयाच्या चिन्मय चव्हाण आणि ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुलच्या परिणी खिल्लारीने बाजी मारत मुकंद लिमिटेडच्या मुकंद स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या ३.५ किलोमीटर अंतराच्या आंतर शालेय मिनी मॅरेथॉन स्पर्धेतील अव्वल स्थान कायम राखले. चिन्मयने गतवर्षीपेक्षा १ सेकंद जास्त घेत १२ : २० : ३० मिनिटामध्ये शर्यत पूर्ण केली. तर मुलींमध्ये विजेती ठरलेल्या परिणाने यावेळी आपल्या कामगिरीत ५ सेकंदांनी सुधारणा करत १३ : २८; ८ मिनिटात शर्यत पूर्ण केली.
मुलांच्या गटात दुसऱ्या स्थानी राहिलेल्या राजर्षी शाहू महाराज विद्यालयाच्या निखिल गवईने चिन्मयसमोर चांगले आव्हान उभे केले होते. पण चिन्मयने आपला गत अनुभवपणाला लावत निखिलला अवघ्या २ सेकंदाच्या फरकाने मागे टाकत पुन्हा एकदा विजेतेपदावर नाव लिहिले. निखिलने १२ : २२ : ०६ मिनिटे अशा कामगिरीसह दुसरे स्थान मिळवले. गेल्यावर्षी दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या ऑक्सफर्ड इंग्लिश स्कुलच्या सुमित खिल्लारीला यावेळी तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सुमितने १२ : ४१ : ९ मिनिटामध्ये शर्यत पूर्ण केली. या गटात राजर्षी शाहू महाराज विद्यालयाचे वैभव मोरे (१२ :५० :०४ मिनिटे ) आणि अनिकेत इंगोळे (१२ :५५ :०३ मिनिटे ) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी राहिले.
मुलींमध्ये विजयी ठरलेल्या परिणीने यावेळी देखील आरामात शर्यत जिंकली. परिणीने १३ : २३ ; ८ मिनिटे अशा कामगिरीसह शर्यत जिंकताना राजर्षी शाहू महाराज विद्यालयाच्या काजल शेखला मागे टाकले. काजलने १३ : ३६ : ०३ मिनिटे अशी कामगिरी नोंदवली. राधिकाबाई मेघे विद्यालयाची श्रावणी गुरवने १३ : ४९ : ०६ मिनिटामध्ये शर्यत पूर्ण करत तिसरे स्थान मिळवले. राजर्षी शाहू महाराज विद्यालयाची मीना कांबळे ( १३ : ५६ : ८ मिनिटे ) आणि राहिली. होलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कुलची इशिका इंगळे पाचव्या स्थानावर राहिली. इशिकाने गेल्यावेळी दुसऱ्या स्थान मिळवले होते. या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत वीस शाळांमधील सुमारे चौदाशे धावपटू सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्यांना एमआयडीसी रबाळे पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक मनीषा काशीद, मुकंद स्पोर्ट्स क्लबचे उपाध्यक्ष पी. सतीश, अरुण पिसे, सचिव राजेश पवार यांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल धावपटूंना सहभाग प्रमाणपत्र आणि शाळांना गौरव चिन्हे देण्यात आली.