मुंबई : चीनच्या निषेधार्थ आम आदमी पक्ष उद्या राज्यभर राज्यस्तरीय आक्रोश प्रदर्शन करणार आहे.
चीन कडून भारतीय जवानांनवर करण्यात आलेल्या हल्ल्याच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. चीन निर्मित कोरोनाच्या संकटाचा भारतासह जगातील जवळपास सर्वच देश कसोशीने सामना करत आहे. अशावेळी कुठलीही मानवता न बाळगता चीन भारतीय सीमारेषेवर तणाव निर्माण करू पाहत आहे, याचा आम आदमी पक्षाने तीव्र निषेध केला आहे. या संकट समयी संपूर्ण देशाच्या सदभावना आपल्या वीर जवानांच्या पाठीशी आहेत, असे आपने म्हटले आहे.
आम आदमी पक्षाचे राज्यातील सर्व कार्यकर्ते उद्या शनिवार २० जून रोजी सकाळी ११ वाजता गाव, तालुका, जिल्हा व शहर पातळीवर राज्यभर आक्रोश प्रदर्शन करणार आहेत. या ठिकाणी आपल्या वीर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात येईल तसेच चीन विरोधात निषेध म्हणून आक्रोश व्यक्त केल्या जाईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत शारिरीक अंतर ठेवून प्रशासनाला कुठलीही तसदी न देता आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते राज्यव्यापी आक्रोश प्रदर्शन करतील.
प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर त्या त्या ठिकाणच्या आंदोलन स्थळी हे आक्रोश प्रदर्शन संपन्न होईल असे आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी सूचित केले आहे.