मुंबई : चीनकडून अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन झाल्याची आकडेवारी आल्याने आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या आणि बेसमेटलच्या किंमतीवर सकारात्मक परिणाम झाला असून सोन्याच्या किंमतीवर मात्र नकारात्मक परिणाम झाला असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे नॉन एग्री कमोडिटीज अँड करन्सीजचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केले येत्या काही दिवसात कोरोना व्हायरसच्या परिणामांनंतर चीनी अर्थव्यवस्थेत झालेल्या सुधारणांवर कमोडिटीजच्या किंमती अवलंबून असतील.
चीनच्या अर्थव्यवस्थेचा अपेक्षेपेक्षा जास्त डेटा आणि या जगातील दुस-या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेने निर्माण केलेली सुधारणेची आशा यामुळे मंगळवारी सोन्याच्या किंमती कमी झाल्या. सोन्याची किंमत ३ टक्क्यांनी घसरून १५७१.७ डॉलर प्रति औस वर बंद झाल्या. स्पॉट सिल्व्हरच्या किंमती ०.५९ टक्क्यांनी वाढून १४.५ डॉलर प्रति औंसवर बंद झाल्या. तर एमसीएक्स चांदीची किंमत १.०४ टक्क्यांनी कमी होऊन ४०,८९४ प्रति किलो वर बंद झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर स्थिर ठेवण्ययासाठी अमेरिका आणि रशियन राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा झाल्याने डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमतीवर मंगळवारी सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे माल्या यांनी सांगितले. या किंमती १.९ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल २०.५ डॉलरवर बंद झाल्या. जागतिक स्तरावर सुरु असलेल्या लॉकडाउनच्या धर्तीवर चिंता असल्याने कच्च्या तेलाच्या किंमती मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर घसरल्या होत्या.