नवी दिल्ली : चीनच्या कंपन्यांनी ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला भरघोस प्रतिसाद दिला आहे. तसेच वेगवेगळ्या अनेक क्षेत्रांत गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे. एप्रिल २००० ते डिसेंबर २०१६ या कालावधीत चीनने ९,९३३.८७ कोटी भारतात गुंतवले आहेत.
सन २०१४ पासून परकीय गुंतवणुकीची आकडेवारी-
२०१४-१५ : ३,०६६.२४ कोटी
२०१५-१६ : २,९७५.१४ कोटी
२०१६-१७(डिसेंबर 16पर्यंत) : १,६९६ कोटी
चीनच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाशी भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने बीजिंग येथे ३० जून २०१४ रोजी एक सामंजस्य करार केला आहे. यानुसार भारतात ठिकठिकाणी औद्योगिक ‘पार्क’ उभारण्यासाठी चीन मदत करणार आहे. या कराराच्या पूर्तीसाठी १६ जुलै २०१४ रोजी उभय देशांचे संयुक्त कृतीदल स्थापण्यात आले असल्याची माहिती वाणिज्य व उद्योग मंत्री डॉ. निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत दिली.