मुंबई : गंभीर गुन्हा घडल्यानंतरही तक्रार नोंदविण्यास पोलीस कशी टाळाटाळ करतात, हे विक्रोळी टागोरनगर येथील बेदम मारहाण प्रकरणाने समोर आले आहे. गुरुवारी(ता.१३) रात्री दहा वाजल्यापासून फिर्यादी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी आले होते. पोलीस टाळाटाळ करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते चेतन अहिरे यांना समजले. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरिही पोलीस ऐकत नव्हते. अखेर मध्यरात्री परिमंडळ सातचे उपायुक्त सचिन पाटील यांना दूरध्वनी करण्यात आला. या नंतर सूत्रे हलल्यानंतरच भंबेरी उडालेल्या विक्रोळी पोलिसांनी गुन्हाची नोंद केली. पोलिसांना गुन्हा नोंदविण्यास भाग पाडणार्या समाजसेवक चेतन अहिरे यांचे कौतुक आता विक्रोळी परिसरात होऊ लागले आहे.
टागोर नगर येथे बुधवारी (ता. १२) सागर (वय-३७-नाव बदलले आहे) या तरुणाला त्याच्याच मित्रांनी बेदम मारहाण केली होती. यानंतर केलेल्या मारहाणीचे चित्रण मोबाइलवर चित्रित करून समाज माध्यमांवरदेखील पसरवले. यासंबधीचे पुरावे विक्रोळी पोलिसांना चेतन अहिरे यांनी सादर करूनही पोलीस ऐकत नव्हते, अखेर सचिन पाटील यांच्यामार्फेत दबाव आणल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तर एकजण फरार आहे. परंतु, या प्रकरणात एकूण पाच आरोपी असताना पोलीस केवळ चारच दाखवत आहेत, असा आरोप अहिरे यांनी केला आहे.
मित्राच्या बायकोची बदनामी करतो, या संशयावरून कमलेश शेट्टी याने सागरला मारण्याची योजना आखली.कमलेशचे मित्र सचिन चौरे, जयेश कांबळे,कालू मणी शेट्टी यांनीही शेट्टीला साथ दिली. योजनेनुसार बुधवारी दुपारी तीन वाजून ३० मिनिटांनी चौरे याने सागरला कमलेशने बोलावले आहे, असे सांगून टागोर नगर येथील विसावा वाईन शॉप जवळील घरी बोलावले. सागर घरी येताच त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्याला नग्न करून सिगारेटचे चटके, चामडी पट्टयानी, अंगावर बसून बेदम मारहाण केली. तब्बल तीन तास मारहाण सुरू होती. सागरचा आवाज बाहेर जावू नये म्हणून गाण्याचा मोठा आवाज करण्यात आला. सायंकाळी सात वाजून ३० मिनिटांनी सागरला सोडण्यात आली. बदनामी होईल या भीतीपोटी त्याने कोणाला सांगितले नाही. अखेर आरोपिंकडूनचचित्रफित पसरली. शेवटी सागरने हा प्रकार घरच्यांना सांगितला.
शुक्रवारी रात्री १० वाजता सागरच्या कुटूंबियांनी विक्रोळी पोलिस ठाण्यामध्ये धाव घेतली. अखेर अहिरे यांच्या प्रयत्नांमुळे पहाटे सहा वाजता पोलिसांनी ३२४, ३२३, ३४२, ५०४ कलमांखाली गुन्हा दाखल केला.