
ठाणे : सुमारे एक लाख 80 हजार रुपयांची रोख बक्षिसे ही न्यू होरायझन आयोजित वसंत एन घाणेकर स्मृती चौथ्या प्रॉस्पेक्ट्स कप जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आकर्षण असणार आहे. ही स्पर्धा 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील श्रीरंग गृहसंकुलातील श्रीरंग विद्यालयात खेळवण्यात येईल असे स्पर्धेचे संयोजक मंदार घाणेकर यांनी सांगितले.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 8, 10, 12 आणि 15 वर्ष वयोगटाच्या लढती खेळवण्यात येतील. दुसऱ्या दिवशी खुली आणि अंधांच्या खुल्या गटाचे सामने होतील. स्पर्धेत प्रत्येक गटातील पहिल्या 10 क्रमांकाच्या विजेत्यांना रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल. त्यात 8 आणि 10 वर्ष गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे तीन, दोन, 1500 आणि चौथ्या व पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा पुरस्कार मिळेल. 12 आणि 15 वर्ष गटातील विजेत्यांना अनुक्रमे चार, तीन, दोन, 1500 आणि एक हजार रुपये मिळतील. खुल्या गटात विजेता ठरणाऱ्यास 15 हजार, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला 11 हजार, तिसऱ्या स्थानी असलेल्या विजेत्यास 8हजार रुपयांचा पुरस्कार मिळेल. अंधांच्या गटातील विजेत्यास अनुक्रमे चार, तीन, दोन आणि चौथ्या व पाचव्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी 1500 रुपये मिळतील. याशिवाय सर्वोत्तम जेष्ठ आणि खुल्या गटातील महिला बुद्धिबळपटू आणि खुल्या गटात चांगली कामगिरी करणाऱ्या ज्युनिअर बुद्धिबळपटूंना विशेष रोख पुरस्कार ठेवण्यात आले आहेत.या स्पर्धेत मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील बुद्धिबलपटूंना सहभागी होता येईल. स्पर्धेच्या प्रवेशिका 11 ऑक्टोबरपर्यत न्यू होरायझन, दादोजी कोंडदेव स्टेडियम, ठाणे पूर्व येथे स्वीकारल्या जातील
अधिक माहितीसाठी 8828829882 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.














