नागपूर : तारापूर, पालघर परिसरातील कंपन्यांचे रासायनिक पाणी पुढील सहा महिन्यात समुद्रात सात किलोमीटर आतपर्यंत सोडण्यात येईल, त्यासाठी 91 कोटी रुपये मंजूर केल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य प्रसाद लाड यांनी तारापूर, बोईसर, जि.पालघर येथील कंपन्यांतील रासायनिक सांडपाण्यामुळे खाड्या प्रदूषित होत असल्याबाबतचा प्रश्न विचारला होता. कदम म्हणाले, खाड्या प्रदूषित करणाऱ्या नऊ कंपन्यांवर कारवाई करण्यात आली असून सहा कंपन्या बंद आहेत. तीन कंपन्यांनी प्रदूषण नियंत्रणाबाबत उपाय योजना सुरु केल्याने त्यांना कंपनी सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. डोंबिवलीच्या प्रदूषण प्रश्नी तसेच प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर करावयाच्या कारवाईबाबत मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही कदम यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप, हेमंत टकले, संजय दत्त, प्रविण दरेकर, किरण पावसकर आणि जयंत पाटील आदींनी भाग घेतला.