मालाड, ता. 3 (वार्ताहर) : जिजाऊ बहुद्देशिय सेवाभावी संस्था, वैजापूर औरंगाबाद येथील संस्थेद्वारे दरवर्षी दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2022 मुंबईतील राज्यघटनेचे अभ्यास आणि प्रचारक विशाल हिवाळे यांना प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते 1 जानेवारी 2022 रोजी पंंचायत समिती सभागृह, वैजापूर येथे देण्यात आला. सामाजिक कार्य आणि संविधानिक मूल्यांच्या संवर्धनासाठी गेली 25 वर्षे करीत असलेल्या उल्लेखनीय चळवळीची दखल घेऊन विशाल हिवाळे यांना हा पुरस्कार देण्यात आला.उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती, सभापती वैजापूर संजय निकम, अध्यक्षा- आत्मनिर्भर फाउंडेशन -मुंबई
श्रमिका दळवी, प्र.संयोजक- सूर्यकांत रामदास पाटील मोटे यांसह अनेक प्रतिष्ठित मान्यवर व संस्थेचे इतर पदाधिकारी विचारमंचावर उपस्थित होते. आयोजक सूर्यकांत पाटील मोटे यांनी पुरस्कार देण्यामागची भूमिका यावेळी विशद केली. सूत्रसंचालन अंजली चिचोलकर यांनी केले. सत्काराला उत्तर देताना, सत्कारमूर्ती विशाल हिवाळे यांनी मनोगत मांडले. हा पुरस्कार घेताना मी निमित्तमात्र असून, गेली 25 वर्षे सामाजिक व संविधानिक चळवळ करताना ज्यांनी, ज्यांनी साथ दिली. सहकार्य केलं. सोबत राहिले त्या सर्वांचा हा सत्कार आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाला असं मी मानतो. माझ्या सहीत ज्यांना आज हा पुरस्कार प्रदान होतोय त्या प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून त्यांच्या महापराक्रमाला सदैव डोळयात व मेंदूत घेऊन कार्यरत राहिलं पाहिजे. परिवर्तनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आधुनिक समाजात रूजविण्याचा प्रयत्न करित राहणे हेच खरं पुरस्कार घेतल्याचं यश असेल असंही हिवाळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले.
सामाजिक क्षेत्रातील कामगिरी करणाऱ्या सुनिता बनसोडे, भाग्यश्री वर्तक, हेमंत कोंडीलकर आणि रत्नाकर सोनावणेंसह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील तज्ञांना हा पुरस्कार देण्यात आला.















