औरंगाबाद : आझाद मैदानातील ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चा पार पडल्यानंतर परतीच्या मार्गावर आपल्या घरी निघालेल्या नारायण थोरात मु. गाजगांव ता.गंगापुर जि. औरंगाबाद तसेच अविनाश गव्हाने मु.बजाज नगर वाळूज जि. औरंगाबाद यांचा भीषण अपघातात मृत्यु झाला. आज (रविवार) नारायण व अविनाश यांच्या घरी जावून छत्रपती संभाजीराजे यांनी कुटुंबाची भेट घेतली व सांत्वन केले.
तसेच या अपघातामध्ये उमेश भगत आणि गौरव प्रजापती मु.सिडको महानगर औरंगाबाद जखमी झाले होते त्यांच्या घरी जावुन तब्येतीची चौकशी त्यांनी केली.
सर्व कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर नारायण थोरात याची परिस्थिती फार हलाखीची आहे त्यामुळे तुम्ही नारायणच्या कुटुंबाला मदत करा असे संभाजीराजे यांना या ठिकाणी उमेश व गौरव यांच्या परिवाराने सांगितले नंतर संभाजीराजे यांनी लगेच नारायण थोरात याच्या घरी जावून कुटुंबाची भेट घेतली व नारायण यांच्या परिवाराला १ लाख रूपयांची वैयक्तिक मदतीचा हात दिला. ही माझ्या दृष्टीने मदत नसून माझ कर्तव्य आहे असे मी समजतो अशा भावना संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केल्या. नारायण हा होतकरु व धडपड करणारा तरुण होता. समाजाला जोडण्यासाठी तो सतत सक्रिय असायचा अशा आठवणी गावकऱ्यांनी संभाजीराजे यांना सांगितल्या. नारायण याच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. नारायण याची आठवण येणाऱ्या तरुण पिढीसमोर जागृत राहावी व यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्याच्या नावाने एक वाचनालय माझ्या खासदार निधितुन उभे केले जाईल याकरिता १५ लाख रूपयांचा निधी संभाजीराजे यांनी जाहीर केला. तसेच अविनाश याच्या घरी भेट देवून त्याच्या नावाने एक ग्रंथालय उभारण्यास निधी द्यायला मी तयार आहे तसा प्रस्ताव गावकऱ्यांनी द्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नारायणच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यावर अवलंबून होता त्यामुळे नारायण याच्या कुटुंबातील सदस्याला अधिकाधिक मदत कशी करता येईल यासाठी मी कटिबद्ध राहील व कायम या सर्व कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहील असेही संभाजीराजे म्हणाले.