रत्नागिरी (आरकेेजी): महाराष्ट्रात दुष्काळ पडला आणि इंग्रजांनी अनन्वित अत्याचार सुरू केले. लोकमान्य टिळक यांनी शेतकर्यांना एकत्र केले. महाराष्ट्रात सर्वत्र रणयज्ञ सुरू करण्याचे आवाहन केले. पेण येथे 20 हजार शेतकर्यांनी मोर्चा काढला. इंग्रज अधिकार्याने शेतकर्यांना अटक करून तुरुंगात टाका, असे आदेश दिले. पण तेवढे तुरुंगच नव्हते म्हणून पटांगणात ठेवण्यात आले. टिळकांनी ही गोष्ट कळताच त्यांनी पेण गाठले. शेतसारा माफ करा, कामे बंद करा आणि सरकारी धान्यसाठा लोकांना खुला करा या मागण्या मान्य केल्या नाहीत तर तुम्ही इंग्रज येथून जीवंत तरी जाल का? असे म्हटल्यावर गोरा इंग्रज घाबरला आणि सर्व मागण्या मान्य केल्या. टिळकांच्या या नेतृत्वाने ते लोकमान्य झाले, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले. कीर्तनसंध्या महोत्सवात चौथ्या दिवशी त्यांनी शेतकरी मोर्चा, टिळकांचे योगदान, चापेकर बंधूंचा पराक्रम मांडला. पूर्वरंगात टिळकांच्या गीतारहस्यातील कर्मयोग समजावून सांगितला.
बुवा म्हणाले की, चापेकर बंधूंनी 300 युवकांची फळी तयार केली. चतुश्रृंगी गडावर लुटुपुटूच्या युद्धातून सराव केला. लाठीकाठी, बंदुका चालवल्या. दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव चापेकर या बंधूंसह महादेव रानडे यांनी जोर, बैठका व्यायामासह शरीर कमावले. मुंबईत व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबरही फासले. आर्य धर्म प्रतिबंध निवारण मंडळ स्थापन करून पुणे, मुंबईत हिंदू धर्माची निंदा करणार्यांना अद्दल घडवली. त्यामुळे ख्रिश्चन धर्मात जाणारे हिंदू व धर्माची निंदा करणार्यांना वचक बसला. प्लेगच्या साथीमध्ये इंग्रज अधिकारी रँडने हिंदूंवर अत्याचार केले. त्या वेळी विठ्ठल मंदिरात शिवराज्याभिषेक दिनी चापेकर यांनी या भारतभूमीमध्ये कुणी पुरुषच उरला नाही हे गीत म्हटले. त्या वेळी लोकमान्य टिळकांनी त्यांना ‘दुसर्यांचे पौरुषत्व पाहण्यापेक्षा आपल्यात पौरुषत्व असते तर रँड जीवंत राहिला नसता’ एवढाच उपदेश केला. त्यानंतर चापेकरांनी प्रेरणा घेऊन कट रचला आणि व्हिक्टोरिया राणीच्या हिरकमहोत्सवानिमित्त कलेक्टरच्या बंगल्यावरून घोडागाडीतून परत जाताना चापेकर बंधूंनी रँडचा वध केला. भारतात इंग्रजी अधिकार्याला मारण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे इंग्रज घाबरले. या घटनेने अनेक क्रांतीकारकांनी प्रेरणा घेतली.
बुवांनी कीर्तनात देह धारण असे ज्याने केला, आमुची माळियाची जात, कैवल्याच्या चांदण्याला, देव विठ्ठल, आम्ही दैवाचे शेतकरी, या भारतभूमीचे ठायी कुणी पुरुषच उरला नाही अशी अनेक पदे सुरेख म्हटली. त्यांना अजिंक्य पोंक्षे याने गायनसाथ केली. तसेच राजू धाक्रस, उदय गोखले, मधुसूदन लेले, प्रथमेश तारळकर, सौ. आदिती चक्रदेव, महेश सरदेसाई यांनी साथसंगत केली.
गोरक्षक, जीवरक्षकांचा सत्कार
गणपतीपुळे येथे समुद्रात बुडणार्यांचे जीव वाचवणारे जीवरक्षक सूरज पवार, राज देवरुखकर, योगेश पालकर, अमेय केदार, सचिन धामणसकर, रोहित चव्हाण, अनिकेत राजवाडकर, महेश वारेकर, मिथुन माने, हेमंत गावणकर, विश्वास सांबरे, संजय माने, अक्षय माने, उमेश म्हादे यांना आफळेबुवांनी सन्मानित केले. तसेच गो रक्षक मुकेश गुंदेचा यांचा गौरव झाला.
स्वच्छ सर्वेक्षणासाठी आवाहन
रत्नागिरी शहराला स्वच्छता सर्वेक्षणात टॉप 20 मध्ये क्रमांक मिळण्यासाठी स्वच्छता राखा, अशी सूचना आफळेबुवांनी केली. तसेच कोकण स्वच्छतेची राजधानी व पर्यटनाचे केंद्र व्हावे याकरिता सदिच्छा व्यक्त केली. या कीर्तनाला नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यासह सुमारे पाच हजार रसिक श्रोते उपस्थित होते.
गर्दीचा उच्चांक व पार्किंगची सुरेख व्यवस्था
कीर्तनसंध्येच्या चौथ्या दिवशी पाच हजारांहून अधिक रसिक श्रोते उपस्थित होते. 400 दुचाकी आणि 100 चारचाकी गाड्यांचे सुरेख पार्किंग करण्यासाठी कीर्तनसंध्या परिवाराचे सदस्य मेहनत घेत होते. त्यामुळे कोठेही वाहतूक कोंडी झाली नाही.