नवनाथ मोरे, ( लेखक विद्यार्थी चळवळीत सक्रिय आहेत आणि विविध विषयांवर सखोल लेखन करतात)
जुन्नरच्या वायव्येस हा काळ्या कातळातील एक किल्ला आहे. चावंड असे त्याचे नाव. डागडुजी न केल्यामुळे जिर्ण झाला आहे. निझामशाहीच्या सुरूवातीच्या काळात निझामाचा एक वारस या किल्ल्यावर काही काळ बंदिस्त होता. त्यानंतर तो गादीवर बसला. चावंड किल्ला मालोजीराजे यांच्या ताब्यात होता; पुढे तो शहाजीराजांच्या ताब्यात होता. इ.स.1818 मध्ये 72 तास लढाई लढून शेवटी 150 मराठ्यांनी जिंकला. पुढे तो इंग्रजांच्या ताब्यात गेला.
चावंड किल्ला भक्कम आणि मजबूत असून तटबंदी नाही. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कुकडी नदीवर वसलेल्या माणिकडोह धरणाच्या कडेला हा दिमखात उभा आहे. सह्याद्रीच्या त्या पावसाळ्यातील हिरवळीत आणि निसर्गरम्य वातावरणात मनाला तो भूरळ घालत असतो. दुरून पाहिले तर आयताकृती आकाराचा हा किल्ला भासतो. गगनाला साद घालत तो उभा आहे. जणू आभाळ किल्ल्यावर टेकल्याचा भास निर्माण होते.
किल्ल्यावर जाताना अवघड पायवाट होती. परंतु आता प्रशस्त पायऱ्या बनविण्यात आल्या आहेत. किल्ल्याच्या कडेला पोहचलात की प्राचीन काळातील कोरीव पायऱ्या पहावयास मिळतात. त्या अवघड पायऱ्या म्हणजे एकावेळी एकच माणूस बाजूच्या दगडाचा आधार घेऊन जाऊ शकेल. इतकी ती अवघड वाट आहे. पायऱ्या चढून गेल्यानंतर पुढेच प्राचीन काळातील तटबंदी आणि दरवाजा पहावयास मिळतो. हे किल्ल्याची ऐतिहासिक खूणच आहे.
किल्ल्यावरती गेल्यानंतर लहान लहान झुडपे, कारवी, गवत यातून वाट काढत आपण पोहचतो तो इतिहासाच्या खुणा असलेल्या हौदांपाशी. येथे सात हौदा आहेत. त्यामधील एका हौदांत उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तर एका हौदाच्या कडेला बांधण्यासाठी व्यवस्था होती असे निदर्शनास येते. ह्या हौदात बारामाही पाणी राहत नाही. हौदांपासून पुढे पायवाटेने अगदी किल्ल्याच्या कडेला गुफा आहे. तशी एवढी मोठी नसली तर उत्तम आहे. त्यासमोरच एक भलामोठा कोरीव खोल हौद आहे. असे म्हटले जाते की तो भुयारी मार्ग असून तो शिवनेरीवरती जातो. परंतु त्या दृष्टीने संशोधनात्मक आधार नाही.
किल्ल्यावरील या ऐतिहासिक खुणा पाहिल्यानंतर किल्ल्याच्या अगदी मध्यभागी उंचवट्यावर चांवडांदेवी मंदीर वसले आहे. त्यामुळेच या किल्ल्याला चावंड किल्ला म्हणतात. चांवडांदेवीच्याच नावावरून गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसले आहे.
इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत-पाहत असताना तेथील संस्कृती-जीवनपध्दतीतील वेगळेपणा जाणवत असते. जुन्नरचा पश्चिप सह्याद्री पर्वतराजीचा विचार केला. तर हा आदिवासी बहुल प्रदेश आहे. तेथील मावळी बोली महादेव कोळी जमात पहावयास मिळते.
सह्याद्रीचा हा प्रदेश पावसाळा आणि हिवाळा या त्रतूत पर्यटनाच्या दृष्टीने उत्तम आहे. या भागातील ओढे-झरे मनाला मोहून टाकतात. किल्ल्यावर खेकड्याच्या विविध प्रजाती पहावयास मिळतात. तसेच फुले, गवत यांच्या विविध जाती पहावयास मिळतात. पावसाळ्यात किल्ल्यावर उत्तम प्रतिच्या आरोग्यदायी रानभाज्याही भेटतात. तेथील माणसाना सोबत घेऊन गेलात तर नक्कीच तुम्हाला याचा स्वाद घेता येईल. कसे बनवता येतील हे ही तुम्ही स्थानिकांना विचार ते नक्की सांगतील.
सह्याद्रीचे हे हिरवाईने नटलेला प्रदेश निश्चितपणे पर्यटकांना भूरळ घालते. नाणेघाट या सातवाहनकालीन व्यापारी मार्ग असलेल्या ठिकाणाकडे जाणाऱ्या मार्गावरच हा किल्ला आहे. जुन्नरपासून अगदी 15 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. पर्यटकांकडून कधीच दुर्लक्षित न होणारा हा किल्ला असून किल्ला पर्यटकांना आकर्षत करतो. तो खुणवतो आहे तुम्हाला तुमच्या येण्याला…एकदा जरूर भेट द्या…नक्कीच तुम्हाला आवडेल.