मुंबई, १४ मे :स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्य, स्वाभिमान, स्वराज्यबाणा, पुरोगामी विचार दिला. ते निष्णात योद्धे, प्रकांड पंडित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी सलग नऊ वर्षे संघर्ष केला. स्वराज्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं. त्यांचा संघर्षमय इतिहास आपल्यासाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज अखेरच्या श्वासापर्यंत लढले. छत्रपती संभाजी महाराज राज्यकारभारात, युद्धनीतीमध्ये कुशल होते. मराठीसह हिंदी, संस्कृत भाषांवर त्यांचं प्रभुत्व होते. त्यांची ग्रंथसंपदा ही त्यांच्या असामान्य विद्वत्तेचं अलौकिक बुद्धीमत्तेचं उदाहरण आहे. छत्रपती संभाजीराजांनी रणांगणावर शौर्य गाजवलं. युद्धनीती, राजनीती कौशल्यांचा उपयोग करुन नऊ वर्षे मोगल, आदिलशाहा, सिद्दी, पोर्तुगीज, तसंच अंतर्गत शत्रूंविरुध्द लढा दिला. स्वराज्य रक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलं. त्यांनी दिलेला लढा, केलेला संघर्ष महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.