रत्नागिरी : आज मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या बांधकामाची पाहणी राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी आमदार संजय कदम, उपविभागीय अधिकारी खेड अविनाश सोनाने, राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे मुख्य अभियंता विनय देशपांडे, अधिक्षक अभियंता विवेक नवले, कार्यकारी अभियंता आर.के.बामणे, उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड, शिंदे डेव्हलपर्सचे सत्यजित निंबाळकर आदी उपस्थित होते.
कशेडी घाट बांधणीचे काम हे मुंबई गोवा महामार्गावरील एक वेगळेपण दाखविणारे आहे. कशेडी बोगदा खोदकामाचे 150 मीटरचे काम पूर्ण झाले असून बोगद्याचे काम विहीत मुदतीत पूर्ण करण्यात येईल तसेच मुंबई गोवा महामार्गाचे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी देखील मंत्रीमहोदयांनी केली. गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा मुंबई गोवा महामार्गावरुन होणारा प्रवास सुखकर होईल याची पूर्ण दक्षता घेण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले. ज्या ठिकाणी पावसामुळे रस्त्याला भेगा गेल्या आहेत अथवा रस्ता नादुरुस्त झाला आहे अशा ठिकाणी दुरुस्तीची कामे अथवा गरज भासल्यास तो रस्ता नवीन केला जाईल अशी माहिती पाटील यांनी दिली.