चंद्रपूर : महाराष्ट्रातील मागास भागांच्या विकासासाठी चंद्रपूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना समर्पित असलेल्या ‘चांदा ते बांदा’ या योजनेतंर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विकास कामांवर आधारित कॉफी टेबल बुकचे आज प्रकाशन करण्यात आले. राज्याचे वित्त ,नियोजन व वन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार , माजी राज्यपाल राम नाईक यांनी या कॉफी टेबल बुकचे आज वित्त मंत्रांच्या दालनात प्रकाशन केले.
2015-16 या आर्थिक वर्षात सुरू झालेल्या या योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांना गती मिळाली आहे.कौशल्यविकास, उद्यमशीलता ते उद्योग अशा सूत्रात प्रकल्प सुरु करून प्रत्यक्ष त्याचा लाभ मिळेपर्यंत योजना राबविण्यात चांदा ते बांदा योजनेमध्ये अधिक भर दिला गेला आहे. यासंदर्भातील राज्यस्तरीय कक्ष मुंबई येथे निर्माण करण्यात आला असून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी या योजनेचा उपयोग केला जात आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, पर्यटन विकास, कृषी, सिंचन, फलोत्पादन, पशु विकास, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, ग्रामविकास आदी क्षेत्रांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या विकास कामांची व त्यासंबंधी यशकथांची मांडणी या कॉफी टेबल बुकमध्ये करण्यात आली आहे. चंद्रपुर जिल्हा माहिती कार्यालयाने जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार ,चांदा ते बांदा योजनेचे जिल्हा समन्वयक सुनील धोंगडे यांच्या मार्गदर्शनातील कॉफी टेबल बुक एक तयार केले आहे.
आज मुंबई येथे माजी राज्यपाल, ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या उपस्थितीत सुधीर मुनगंटीवार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रबर्ती, चांदा बांदा प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, या प्रकल्पातील युवा व्यवसायी यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. चांदा ते बांदा या अभिनव योजनेची परिणामकारकता या कॉफी टेबल बुक मार्फत सामान्य जनतेला माहिती पडेल, अशी अपेक्षा यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी देखील या योजनेच्या मार्फत ग्रामीण भागातील महिला सबळीकरणाला गती मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील विकास कामांवर आधारित सिंहावलोकन हे अन्य कॉफीटेबल बुक देखील मुनगंटीवार यांनी सादर केले.