नवी मुंबई, दि. ६ : “तोक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील नागरिकांच्या संरक्षणासाठी कोकण विभागातील जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच आपत्ती काळात प्रशासन सज्ज असल्याबाबत जिल्हा अधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. आता या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर भयानक “तोक्ते” चक्रीवादळात झाले आहे. याचा फटका गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसत आहे. काल कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने कहर केला आहे. तर बऱ्याच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.”तोक्ते” चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता कोकण विभागातील सर्व नौका समुद्रकिनारी दाखल झाल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेल्या 512 नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहचल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेल्या 96 नौका समुद्रकिनारी सुखरूप पोहोचल्या आहेत.दिघी बंदर येथे मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील 25 बोटी आश्रयासाठी आल्या आहेत.
चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मच्छीमारांसाठी तसेच समुद्रकिनारी रहिवासी असलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला होता.
रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.
किनारपट्टीवर धोकादायक क्षेत्रातील राजापूर आणि गुहागर तालुक्यातील नागरिकांचे स्थलांतरण झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील ८५ कच्च्या घरातील ३६५ नागरिकांचे परिसरातील आजू बाजूच्या घरात स्थलांतर करण्यात आले आहे.
आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा रुग्णालय सज्ज
रायगड जिल्हा रुग्णालयातील जिल्हा रक्तपेढी जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे सतर्क व सज्ज असल्याची माहिती जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी व रक्त संक्रमण तंत्रज्ञ श्री. हेमकांत सोनार यांनी दिली आहे.
चक्रीवादळाचा कोकण रेल्वेला फटका
सकाळी नेत्रावती एक्सप्रेस ट्रेन मडगाववरून थिवीमकडे जात असताना या ट्रेनला अपघात झाला. एक भलं मोठं झाड ट्रेनवर कोसळल्यानं मध्येच ही ट्रेन थांबवावी लागली. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. लोहमार्गावर पडलेल्या या झाडाला हटवून रेल्वेसेवा लवकरच सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वेतील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. कोकणातील वातावरण झपाट्याने बदलत आहे. परिणामी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच अरबी समुद्रात सुरू असलेल्या चक्रीवादळामुळे राज्यात गारवा निर्माण झाला आहे.