अलिबाग,जि.रायगड, 10 June : जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, वीजेच्या खांबांची पडझड झालेली आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर वीजेचे खांब पडल्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झालेला असून खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्यास शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज केले.
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात उपविभागीय अधिकारी कार्यालय, पेण येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार डॉ.अरुणा जाधव, मुख्याधिकारी अर्चना दिवे, महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता डी. आर. पाटील आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री.तनपुरे म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र नव्याने पोल उभे करणे अथवा डीपी बसविणे हे काम तसे सोपे असले तरी जुने साहित्य वापरून त्याची पुनर्बांधणी करणे खूप धोक्याचे आहे. श्रीवर्धन, म्हसळा. मुरुड, अलिबाग, पेण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक पोलची पडझड झालेली आहे. मात्र प्रत्यक्षात तिथे पोल उभे करणे खूपच जिकिरीचे काम आहे. त्यातच करोनामुळे इतर जिल्ह्यातून मनुष्यबळ मिळणे अवघड झाले आहे. तरीदेखील शासन आणि प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने या परिस्थितीवर मात करणे, हे आवश्यक आहे. शासनाकडून प्रशासनाला काहीही कमी पडू दिले जाणार नाही.
उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना देताना ज्या ठिकाणी वीजेचे खांब पडले आहेत तेथे नवीन खांब बसवून ती कामे तातडीने पूर्ण करुन वीजपुरवठा पूर्ववत करावा. तसेच दोन ते तीन दिवसात पूर्ण एसटी लाईनचे काम पूर्ण करावे. या कामासाठी बाहेरुन जेवढे उपलब्ध होईल तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. स्थानिक मजूर लावायचे असतील तसेच काही साधनसामग्री खरेदी करावयाची असेल, त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. वीजपुरवठा पूर्ववत सुरु करण्यासाठी आवश्यक लागणारे साहित्य दोन दिवसात उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकारात या कामासाठी निधी खर्च करण्याचे अधिकार दिलेले आहेत. परंतु एकंदरीत परिस्थिती पाहता शासन, प्रशासन, ग्रामस्थ,नागरीक या सर्वांनी एकजुटीने या सर्व परिस्थितीचा सामना केला पाहिजे, असेही यावेळी श्री.तनपुरे यांनी सांगितले.