रत्नागिरी, प्रतिनिधी : निसर्ग वादळाच्या धर्तीवर तौत्के चक्रीवादळातील बाधितांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला. जिल्ह्याचे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे 16 कोटी 48 लाख नुकसान झाले आहे. मात्र निकष बदलून रत्नागिरी जिल्ह्याला 30 कोटी 72 लाखाची नुकसान भरपाई देण्याचे निश्चित झाले आहे. यामध्ये कृषीचे 20 टक्के पंचनामे शिल्लक असल्याने त्यामध्ये वाढ होणार आहे. कोकणातील सहा जिल्ह्यांसाठी 252 कोटी रुपये भरपाई आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी दिली. झुम अॅपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
निकष बदलून भरपाई देण्याची घोषणा
यावेळी मंत्री सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक आज झाली. उद्धव ठाकरे यांनी दोन्ही जिल्ह्याचा दौरा करून बाधितांना नाराज करणार नाही, अशी मदत देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार निसर्ग चक्रीवादळाच्या धर्तीवर मदत देण्याचा निर्णय झाला. एनडीआरएफ आणि एसडीआरएपच्या निकषानुसार 72 कोटीची भरपाई द्यायची होती. मात्र निकष बदलून कोकणातील सहा जिल्ह्यांसाठी 252 कोटीची भरपाई देण्याची आज घोषणा करण्यात आली. कृषीचे जे काही पंचनामे झाले आहेत. त्याला 100 टक्के भरपाई दिली जाईल. मात्र अजून 20 टक्के पंचनामे शिल्लक आहेत. त्याची वाढीव भरपाईही देण्यात येणार आहे. जाहीर झालेली भरपाई बाधित व्यक्तीं, कुटुंब, मच्छीमार, पशुधन, मृत व्यक्ती यांच्यासाठी आहे. शासनाच्या एजन्सीचा यामध्ये काही संबंध नाही.
अशी मिळणार मदत
वादळामुळे जिल्ह्यात 6 हजार 758 घरांचे 10 कोटी 15 लाख 20 हजाराचे नुकसान झाले आहे. तर पूर्णतः नुकसान झालेली 17 घरे असून त्याचे 25 लाख 50 हजाराचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या निकषानुसार अंशतः आणि 15 टक्के नुकसान झालेल्यांना 6 हजार एवजी 15 हजार दिले जाणार आहेत. 25 टक्केपर्यंतच्या नुकसानीसाठी 15 हजारऐवजी 25 हजार दिली जाणार आहे. 50 टक्के घराला 50 हजार तर पूर्णतः नुकसान झालेल्या घरांना 1 लाख 50 हजार मदत दिली जाणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.