अलिबाग,जि. रायगड (जिमाका) 19 June : जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व प्रशासन करीत असलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी खा.सुनिल तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, आदी उपस्थित होते.
या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, जिल्ह्यातील दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, वीजेच्या खांबांची पडझड झाली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. दि.5 जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांसाठी 100 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. त्यापैकी आतापर्यंत 72 कोटी रुपयांचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले असून मदत वाटपाचे काम सुरु आहे. ही मदत जिल्ह्यासाठी पुरेशी नसल्याने वाढीव मदत देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाने आणखी 301 कोटींची मदत रायगड जिल्ह्यासाठी जाहीर केली आहे. यापैकी 242 कोटींची मदत ही घरांच्या नुकसान भरपाईसाठी आहे. आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यांनुसार घरांचे अंदाजे 395 कोटींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अजूनही पंचनाम्यांचे काम सुरुच आहे. ज्या मच्छिमारांच्या होड्यांचे नुकसान झाले आहे, त्यापैकी अंशत: नुकसानीसाठी 10 हजार रुपयांची मदत तर ज्या होड्यांचे पूर्णत: नुकसान झाले आहे,त्यांना 25 हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या.
दरम्यान रू.301 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होताच ही मदत नुकसानग्रस्तांच्या खात्यामध्ये तात्काळ जमा करण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाने पंचनामे करताना नुकसान झालेल्या प्रत्येक लहानसहान गोष्टींचीही नोंद काटेकोरपणे घ्यावी, अशा सूचनाही संबंधितांना दिल्या.