मुंबई : रस्त्यावरून चालणार्या पादचार्यांच्या विशेषत: महिलावर्गाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेण्याच्या घटनांत वाढ झाली होती. मोटारसायकलवरून येऊन धूम स्टाईलने आरोपी सोनसाखळी हिसकावून घेऊन पळ काढत होते. त्यांना पकडणे मुंबई पोलिसांसमोर आव्हान बनले होते. हेच आव्हान पेलत परिमंडळ १० पोलीस उपायुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पोलिसांनी सराईत सोनसाखळी चोरांना अटक केली. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
सोनसाखळी चोरीच्या विविध घटनातील चार साखळी चोरांना पोलिसांनी बेड्या टोकल्या. परिमंडळ १० पोलीस उपायुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नईम शब्दरअली अन्सारी (२२ गुन्हे , वांद्रे), धीरज कनोजीया (२८ गुन्हे, वांद्रे), जफ्फर खान (४५ गुन्हे, शिवडी) आणि अब्दुल समद उर्फ शोएब हमीद हमदरे याच्यावर ३३ गुन्हे (वांद्रे) दाखल आहेत. हे चारही गुन्हेगार रेकॉर्डवरील आहेत. जफ्फर खान सोनसाखळी चोरी प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. पोलिसांनी एक मोटारसायकल आणि १०० ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अशा प्रकारचे गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे.