रत्नागिरी, प्रतिनिधी : शिवसेना मुंबईत पाय रोवून उभी आहे. शिवसेनेची घोडदौड कोणीही रोखू शकत नाही. चार काय चाळीस नवीन मंत्री झाले तरी शिवसेनेला कोणीही रोखू शकत नाही. शिवसेनेचा मुंबई महानगर पालिकेवर भगवा फडकणारच अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते आज रत्नागिरीतील हातखंबा इथे तरुणांच्या लसीकरण कार्यक्रमात बोलत होते.दरम्यान जिल्हा नियोजन समितीची बैठक 24 ऑगस्ट रोजी आहे आणि त्याच दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. याबाबत बोलताना सामंत म्हणाले की, नारायण राणे यांचा दौरा आहे म्हणून रत्नागिरी जिल्हा नियोजनची बैठक लागली असं अजिबात नाही. बैठक आणि राणेंचा दौरा हा केवळ योगायोग आहे. असं उदय सामंत यावेळी म्हणाले.
बैलगाडा शर्यतीसंदर्भात आंदोलन करणाऱ्यांनी केंद्राकडे देखील याबाबतची मागणी करावी. केंद्रात त्यांचं सरकार आहे. केंद्र सरकारनं देखील याबाबत निर्णय घेतला पाहिजे. महाविकास आघाडी सरकार चांगलं काम करत आहे म्हणून काहींकडून असे प्रकार होत असल्याची टीका यावेळी सामंत यांनी पडळकर यांचं नाव न घेता केली आहे.
कॉलेज सुरू करण्याबाबतचा निर्णय त्या – त्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून घेतला जाईल. याबाबत जिल्हाधिकारी अहवाल डिझास्टर मॅनेजमेंटला देतील. त्यानंतर टास्क फोर्स याबाबत निर्णय घेईल असं सामंत यांनी हातखंबा इथं स्पष्ट केलं आहे.















