
लेखक : नवनाथ मोरे
” बंगाल, केरळमधून कम्युनिस्टांना हाकलू, पुतळ्याची नाही जिवंत माणसाची चिंता करा, कम्युनिस्ट विचारधारेला उखडून फेकायला हवे,” असे संघाचा स्वयंसेवक सुुनील देेेवधर म्हणाला होता. प्रसार माध्यमांकडून या बेताल वक्तव्यांना चांगलीच कुप्रसिद्धी दिली गेली. देवधर आणि प्रसारमाध्यमे विसरली की तळागाळात रुजलेली विचारधारा अशी कोणाच्या बोलण्याने संपत नसते तर तिची वाटचाल अविरतपणे सुरूच असते. हे सांगण्याचे कारण म्हणजे संपवण्याचे अनेक प्रयत्न होऊनही भारत देशातील कम्युनिस्ट चळवळ नुसतीच अभेद्य राहिली नाही तर तिने १०० व्या वर्षात पदार्पण केलय. देशाच्या स्वातंत्र्य युद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या लोकशाहीवादी कम्युनिस्ट चळवळीबद्दल द्वेष पसरवणे एका कट्टर धर्मवादी आणि स्वतःच स्वतःला देशभक्त म्हणविणाऱ्या गटाला जमते तरी कसे? हाच प्रश्न सच्च्या भारतीयाला सतावत आहे.
100 व्या वर्षांत पदार्पण केल्यानिमित्त १७ ऑक्टोबरला बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या सभेला अभूतपूर्व गर्दी झाली. त्यातून एक स्पष्ट झाले की भारत देशातून कम्युनिस्ट विचारधारा कधीही संपणारी नाही. ती एकसंघ आहे. देशाच्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतल्याचा वारसा असणाऱ्या कम्युनिस्टांना संपविण्याची कारस्थाने देवधरसारख्या द्वेषी विचारधारांनी आखल्या. द्वेष करणेच ही त्यांची परंपरा आहे. तर लोकांसाठी, देशासाठी अविरतपणे कार्यरत राहणे ही कम्युनिस्ट विचारधारा आहे. म्हणूनच तर शतकीय वाटचाल कम्युनिस्ट चळवळ करू शकली. लाल बावटावाले म्हणजे साधे, सरळ, विचाराने प्रामाणिक, वेळ पडल्यास रस्त्यावरची लढाई लोकशाही मार्गाने लढणारे, म्हणून असंख्य भारतीयांच्या हृदयात ते वसले गेले आहेत.
जातीयता आणि धर्मांधतेचा पुरस्कार करणारे नेहमी कम्युनिस्टांना टार्गेट करत आले आहेत. त्यावर मात करत कम्युनिस्टांनी आपला समतेचा न्यायाचा लढा निरंतर सुरू ठेवला आहे. राजकारणातील चढ-उतारांनी कम्युनिस्टांनी कधीही हार मानलेली नाही. ते नेहमी आशावादी राहिले आहेत. कम्युनिस्टांनी नेहमीच वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासत समतेचा अजेंडा फक्त बोलण्यात नाही, तर कृतीत उतरवला. त्याचे रोल मॉडेल केरळ आहे. बंगाल आणि त्रिपुरामध्ये डाव्यांची पिछेहाट झाली असली तरी डावे संपले नाहीत. उलट, जन आंदोलनाच्या पातळीवर डाव्यांचे बलाबल वाढले आहे. कम्युनिस्ट चळवळीने लोकशाहीस घातक ठरेल असे राजकारण कधीही केलेलं नाही. कम्युनिस्ट विरोधी विचारधारा कशा प्रकारे सत्तेत आली. त्यांनी धर्माचे, विद्वेषाचे राजकारण करून समाजात ध्रुवीकरणं कसे केले, हे येथे नव्याने सांगायला नको. याउलट धर्मवादाचे राजकारण कम्युनिस्ट पक्षाने कधीही केलेलं नाही. सत्ताकारणापेक्षा समाजकारणालाच कम्युनिस्ट पक्षांनी नेहमीच महत्व दिले. त्यातूनच विविध संघटनांच्या माध्यमातून पक्ष भक्कम राहिला.
१०० व्या वर्षांत पदार्पण करणे, हे कम्युनिस्ट चळवळीचे फार मोठे यश आहे. विविध जाती, धर्म यांच्यात अखंड बुडालेल्या भारत देशात समानतावादी कम्युनिस्ट चळवळ रुजवण्याचे आव्हान कम्युनिस्टांनी पार पाडले आहे. त्या निमित्त कोट्यवधी कॉम्रेडस ना लाल सलाम…!















