Mumbai : मध्य रेल्वे ही भारतीय उपखंडातील अग्रगण्य रेल्वे आहे. मध्य रेल्वेने पर्यावरण संवर्धनातही पुढाकार घेतला आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध पावले उचलली आहेत.
श्री अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली, कार्यस्थळे आणि रेल्वे परिसर स्वच्छतेचा प्रचार आणि खात्री करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी विविध उपायांचा अवलंब केल्यामुळे मध्य रेल्वेने ६व्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार २०२१ मध्ये प्रतिष्ठित ‘पर्यावरण आणि स्वच्छता शिल्ड’ जिंकली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर व सोलापूर स्टेशन तसेच कल्याण येथील सेंट्रल रेल्वे स्कूल व वर्कशॉप युनिटसारख्या इतर युनिट्सना आयजीबीसी सुवर्ण प्रमाणपत्र मिळाले आहे.
भारतीय रेल्वेवरील सर्वाधिक ८७ इको-स्मार्ट स्थानके मध्य रेल्वेत आहेत. डिसेंबर २०२१ पर्यंत ८७% इको स्मार्ट स्टेशन्सना आयएसओ प्रमाणपत्र मिळवून देण्यातही मध्य रेल्वे यशस्वी झाले आहे. (सध्या ८७ पैकी ७६ इको स्मार्ट स्टेशन आयएसओ प्रमाणित आहेत). मध्य रेल्वेने राज्य/केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जल कायदा आणि वायु कायद्यांतर्गत मध्य रेल्वेच्या ८७ इको-स्मार्ट स्थानकांपैकी ७४ स्थानकांसाठी संमती मिळवली आहे. अशाप्रकारे प्रदूषण नियमांचे पालन करून समाधानकारक गुण मिळविण्याच्या दृष्टीने अत्यंत कठीण काम केले आहे.
मध्य रेल्वेने मोठ्या प्रमाणात अक्षय ऊर्जा सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प आणि स्वयं-शाश्वत हरित स्थानके उभारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तसेच १००% डब्यांमध्ये बायो-टॉयलेट बसवण्यात यश मिळालं आहे ज्यामुळे स्वच्छता सुनिश्चित होईल आणि ट्रॅकला गंज टाळता येईल.
मध्य रेल्वेच्या व्यापक वृक्षारोपण मोहिमेमुळे सुमारे १०६ हेक्टर रेल्वेची जमीन वृक्षारोपणासाठी वापरण्यात आली आहे. गेल्या ६ वर्षात सुमारे २५ लाख रोपे लावलेल्या १५ रोपवाटिका आहेत ज्यात तीन मियावाकी वृक्षारोपण आणि वनौषधी उद्यानांचा समावेश आहे ज्यामुळे कार्बन फूट प्रिंट कमी करण्यात आणि रेल्वेची अतिरिक्त जमीन सुरक्षित करण्यात मदत झाली आहे. भुसावळ येथे उभारण्यात आलेले कंपोस्टिंग प्लांट आणि लोणावळा येथे उभारलेले कंपोस्टिंग मशीन सेंद्रिय कचऱ्याचे पुनर्वापर करण्यायोग्य खतामध्ये रूपांतरित करते.
मध्य रेल्वेने प्रभावी जल व्यवस्थापनासाठीही विविध पावले उचलली आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्समुळे मागील वर्षाच्या तुलनेत १२.८६% पाण्याची बचत झाली आहे. ऑटोमॅटिक कोच वॉशिंग प्लांट्स, सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स, वॉटर री-सायकलिंग प्लांट्स आणि एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्समुळे दररोज १ कोटी लिटर पाणी उत्पादन क्षमता निर्माण झाली आहे. भारतीय रेल्वेच्या इतर कोणत्याही झोनवरील सांडपाणी प्रक्रिया क्षमतेची ही सर्वोच्च क्षमता आहे. या उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात ताज्या/चागल्या पाण्याचा वापर कमी झाला आहे आणि ट्रेन धुण्याचा आणि ट्रेनच्या पाणी भरण्याचा वेळ वाचला आहे.
चांगली स्वच्छता आणि स्वच्छ पर्यावरणाच्या दिशेने इतर पावले म्हणून मुखपट्टी, हातमोजे वितरण, बॅटरीवर चालणाऱ्या स्प्रेअरद्वारे स्वच्छता, प्रवाशांच्या स्वच्छतेसाठी काही डब्यांमध्ये पायांवर चालणाऱ्या पाण्याच्या नळांची व्यवस्था, बॅटरीवर चालणारे स्क्रबर, उच्च जेट प्रेशर यांसारख्या यांत्रिक तंत्राद्वारे स्वच्छता यांचा समावेश होतो. बॅटरीवर चालणारे सिंगल डिस्क स्क्रबर ड्रायर, व्हॅक्यूम क्लिनर, बॅटरीवर चालणारे स्वीपिंग मशिन आणि मध्य रेल्वेच्या कलाकारांनी नियमितपणे स्टेशन परिसरात जागरुकता निर्माण करण्यासाठी सादर केलेले नुक्कड नाटक यामुळे स्थानक आणि कामाच्या ठिकाणांची स्वच्छता आणि साफसफाई व्यावसायिक स्तरावर नेण्यात आली आहे.
पर्यावरणाच्या संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मध्य रेल्वेने नुकतेच माथेरान नगरपरिषदेच्या सहकार्याने दोन दिवसीय ‘माथेरान रेल्वे उत्सव’ – सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले. या उत्सवात माथेरान लाइट रेल्वेचा प्राचीन इतिहास प्रदर्शित करण्यात आला, मध्य रेल्वेच्या हरित उपक्रमांचे चित्रण आणि माथेरानचे पर्यावरण – संवेदनशील झोनमध्ये उत्क्रांतीचे चित्रण करण्यात आले. तसेच माथेरान लाइट रेल्वे (MLR) हे सांस्कृतिक लँडस्केप म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले आहे तसेच सांस्कृतिक लँडस्केपच्या ‘संरक्षण आणि व्यवस्थापना’साठी युनेस्को ग्रीस मेलिना मर्कोरी आंतरराष्ट्रीय पारितोषिक-२०२१ साठी शिफारस करण्यात आली आहे.