मध्य रेल्वेच्या कल्याण येथील विभागीय रेल्वे रुग्णालयाला रुग्णालय क्षेत्रातील ऊर्जा कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार-२०२१ ने सन्मानित करण्यात आले.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, ऊर्जा बचतीसाठी रेल्वे सातत्याने प्रयत्न करीत आहे. राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार म्हणजे मध्य रेल्वेने रुग्णालय क्षेत्र अधिक ऊर्जा कार्यक्षम बनवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची ओळख आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य गाठण्यासाठी मध्य रेल्वे आपली वाटचाल सुरूच ठेवणार आहे. श्री गोपाल चंद्र, प्रधान मुख्य विद्युत अभियंता, मध्य रेल्वे आणि श्री शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, मध्य रेल्वे यांनी दि. १४.१२.२०२१ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री आर के सिंग, माननीय केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री, भारत सरकार यांच्याकडून पुरस्कार स्वीकारला. इमारतींच्या श्रेणी अंतर्गत, ६२.१८% ऊर्जा कार्यक्षमता प्राप्त करणार्या विभागीय रेल्वे रुग्णालय, कल्याण याची समितीने निवड केली आहे आणि ऊर्जा कार्यक्षमतेतील अपवादात्मक कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात.
मध्य रेल्वे रूग्णालय, कल्याण द्वारे रूफटॉप ग्रिड सोलर प्लांटची स्थापना, ऊर्जा कार्यक्षम बीएलडीसी पंखे, एलईडी लाईट्ससह पारंपारिक लाईट फिटिंग बदलणे, बीईई स्टार रेटेड एअर कंडिशनरची तरतूद इत्यादी विविध उपायांमुळे ऊर्जेमध्ये ३६.५% बचत झाली आहे. यामुळे नूतनीकरणक्षम ऊर्जेची निर्मिती ६३.४८% ने वाढली आहे. या उपायांमुळे इलेक्ट्रिकल युनिट्सचा वापर ४९.७४% ने कमी होण्यास मदत झाली आहे.















