
याबाबत बोलताना माने म्हणाले की, काही कॅनिंगवाले इथल्या शेतकऱ्याला दाबण्याकरिता कॅनिंगसाठी लागणारा माल परराज्यातून आणतात. मात्र रत्नागिरीच्या शेतकऱ्याचा आंबा घेतल्याशिवाय, रत्नागिरीतल्या कुठल्याही मोठ्या प्रोसेसरला अन्य ठिकाणचा स्वस्त माल आम्ही इथं आणू देणार नाही, असा इशारा माने यांनी दिला आहे. तसेच कमी भावात कॅनिंगला इथला आंबा न घेता, कॅनिंगसाठीच्या इथल्या दर्जेदार आंब्याला किमान 40 रुपये भाव हा मिळालाच पाहिजे, या दृष्टीने रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाची भूमिका राहिल. तसेच शेतकऱ्यांना याबाबत काही अडीअडचणी आल्या तर रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाचा चेअरमन म्हणून तुमच्या सोबत असणार आहेच, पण संघर्ष करण्याची वेळ आली तर मी तुमच्यासोबत असणार आहे हा विश्वास मी तुम्हाला देत असल्याचं माने यावेळी म्हणाले..
तसेच माने म्हणाले की, कोकणाचं अर्थशास्त्र आंबा व्यावसायवर आहे. मात्र लहरी हवामानाचा परिणाम हापूसच्या उत्पादनावर झालेला आहे. आंबा पीक हे फक्त 3 महिन्याचं वाटत असलं तरी 10 महिने आंबा उत्पादक शेतकरी या आंब्यासाठी मेहनत घेत असतो.. आज हापूसला जीआय मानांकन मिळाल्यामुळे एक चांगला दर्जा निर्माण झालेला आहे, मात्र दुर्दैवाने हापूसच्या नावाखाली आज इतर राज्यातील आंबा सुद्धा विकला जातो. त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जीआय मानांकन नोंदणी करणं आवश्यक असल्याचं माने यावेळी म्हणाले.
तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्याच्या आंब्याला थेट चांगल्या प्रकारे भाव मिळाला पाहिजे. मात्र राज्य सरकारचं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आजही व्यापारी किंवा दलालांवर या व्यवसायासाठी अवलंबून राहावं लागतं. गेल्या वर्षी आम्ही सर्वांनी थेट आंबा विक्रीसाठी प्रयत्न केले होते. काही परिणाम हा प्रयत्न यशस्वी झाला. मात्र यावर्षी पुन्हा एकदा कोरोनाचं संकट गडद झालेलं आहे, त्यामुळे जो थेट ग्राहक होता तो सुद्धा तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. त्यामुळे आंब्याला चांगला दर मिळाला नाही तर शेतकरी अडचणीत येणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्याच्या आंबा विक्रीला स्थानिक भागात किंवा राज्यात कुठेही अडचण येणार नाही याकरिता मायबाप सरकारने भूमिका घेतली पाहिजे असंही माने यावेळी म्हणाले.