मुंबई: समाजातील वाढते तंबाखूचे प्रमाण कमी करण्याची नितांत आवश्यकता आहे. तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या कर्करोगाचे उपचार महाग आहेत. गरीब कर्करुग्णांवर उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य सेवा सक्षम करणे आवश्यक असून केंद्र शासनाने सुरू केलेली आयुष्यमान भारत : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही कर्करुग्णांसाठी जीवनदायी ठरेल, असा विश्वास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.वैद्यकीय सेवेतील व कर्करोग उपचारातील उत्कृष्ट कार्याबद्दल प्रिंन्स अलिखान हॉस्पिटलचे अँकॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुलतान प्रधान यांना राव यांच्या हस्ते यंदाचा धन्वंतरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. हॉटेल ताजमहल पॅलेस येथे झालेल्या या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, त्रिपुरा आणि बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील, डॉ. बी.के. गोयल हार्ट फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. लेखा पाठक, राहुल गोयल, मुंबई हॉस्पिटल ट्रस्टचे चेअरमन भरत कुमार तपारिया यांच्यासह वैद्यकिय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विद्यासागर राव म्हणाले की, डॉ. सुलतान प्रधान यांनी कर्करोग उपचार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांनी देशातील आणि देशाबाहेरील हजारो कर्करोगाच्या रुग्णांना नवीन जीवन दिले आहे. डॉ. प्रधान यांनी स्थापन केलेल्या कर्करोग पुनर्वसन केंद्राने हजारो कर्करुग्णांना मानसिक आधार देण्याचे काम केले असून त्यांना नवीन जीवन जगण्याची आशा आणि आत्मविश्वास मिळवून दिला आहे.राज्यातील अनेक भागातील नागरिक विशेषतः शालेय विद्यार्थी तंबाखू व गुटखा या व्यसनाच्या अधीन झाल्याचे दिसून येत आहे. गडचिरोलीसारख्या भागातही १२ ते १५ वर्षांच्या वयोगटातील शालेय मुले तंबाखू, गुटखा आणि सुगंधी सुपारीसारख्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे समजून आश्चर्य वाटले. अशा लोकांना या व्यसनाच्या बाहेर काढण्याची आवश्यकता आहे.पूर्वी राज्यात एकच कर्करुग्णांवर उपचार करणारे रुग्णालय होते. मात्र, आज राज्यात अनेक खासगी रुग्णालये ही कर्करोगावर उपचार करत आहेत, ही दिलासादायक गोष्ट आहे. मात्र, कर्करोग उपचारासाठी सार्वजनिक रुग्णालयांचे सक्षमीकरण करणे आवश्यक असल्याचेही श्री. विद्यासागर राव यांनी यावेळी सांगितले.गेल्या शतकापूर्वी मुंबईतील सर जमशेदजी जीजीभाई, डेव्हिड ससून, नाना शंकरशेठ यांच्यासह अनेक समाजसेवकांनी स्वतःच्या पैशातून गरीब नागरिकांसाठी हॉस्पिटल, सेनेटरियम, धर्मशाळा उभारल्या. आज प्रत्येकांना समाजाच्या फायद्यासाठी अशा प्रकारची सेवा करण्याची वेळ आली आहे. कर्करोगग्रस्त रूग्णांना मानसिक आणि शारीरिकरित्या सुदृढ करण्याबरोबरच उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी रूग्णसेवा सदनची गरज भासते. अशा लोकांसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीतून सामाजिक उत्तरदायित्व म्हणून अशा सेवासदनांची उभारणी करण्याचे आवाहन राज्यपाल विद्यासागर राव यांनी यावेळी केले.शिंदे यांनी डॉ. प्रधान यांच्या कार्याचा गौरव करून वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाचा उपयोग गरीब वर्गासाठी व्हावा. त्यासाठी डॉ. प्रधान यांच्यासारख्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी पुढाकार घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.पुरस्कारार्थी डॉ. सुलतान प्रधान यांनी मनोगतात आजवरच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना या कामात प्रोत्साहन देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी माजी राज्यपाल पाटील व तपारिया यांनीही मनोगत व्यक्त केले.