नागपूर : विविध प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून कर्करोगाचे त्वरित व अचूक निदान होणे गरजेचे आहे. हॉस्पिटल व रिसर्च सेंटरसाठी राज्य शासनातर्फे भरीव मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.कॅन्सर रिलिफ सोसायटी यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री सुधाकर कोहळे, सुनिल केदार, डॉ. मिलिंद माने, कॅन्सर रिलिफ सोसायटीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार, उपाध्यक्ष बसंत लाल साव, सचिव अशोक कृपालिनी, रणधीर जव्हेरी, आवतराम चावला, सुरेश शर्मा, डॉ. मदन काफरे, संचालक डॉ. सुभ्रजीत दासगुप्ता, महानगरपालिका आयुक्त अश्विन मुद्गल, आरोग्य उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल आदी उपस्थित होते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर ही संस्था मागील ४५ वर्षांपासून गरीब कर्करुग्णांची अविरत सेवा करीत आहे. विविध प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून यासाठी कर्करोगाचे त्वरित व अचूक निदान होणे गरजेचे असते. कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाकडूनही विविध उपाययोजना करण्यात येत असून याअंतर्गत कर्करोगाच्या निदानासाठी मोहिमही राबविण्यात येत आहे.या प्रसंगी गडकरी म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर आता नवीन रुपात उभारण्यात येणार आहे. दिवसेंदिवस विविध प्रकारच्या कर्करुग्णांची संख्या वाढत आहे. नागपूर येथे विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेश व अन्य राज्यातूनही कर्करोगावरील उपचारांसाठी रुग्ण मोठ्या प्रमाणात येत असतात. गरीब रुग्णांना माफक शुल्कात सेवासुविधा देण्यात याव्यात. कर्करोगाचे त्वरित व अचूक निदान व्हावे, या सेवा दर्जेदार असाव्यात, असेही गडकरी यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन व अत्याधुनिक इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करुन कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी यावेळी कर्करोगाच्या निदान चाचणीसंदर्भातील माहितीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.विदर्भ कॅन्सर सोसायटीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी स्वागत केले. संचालक डॉ.दासगुप्ता यांनी प्रास्ताविकात सांगितले की, मध्य भारतातील कर्करुग्णांना अल्पदरात उपचार उपलब्ध व्हावेत या हेतूने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलतर्फे १९७४ पासून कार्यरत आहे. या संस्थेच्या संशोधन व उपचार केंद्राच्या उभारणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कर्करुग्णांसाठी २०० खाटांच्या रुग्णालयात सहा अत्याधुनिक मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर्स, आयसोलेशन कक्ष, केमोथेरपी कक्ष, खासगी वातानुकुलित कक्ष, अतिदक्षता विभाग, डॉयग्नोस्टिक्स ॲण्ड रेडिओलॉजी विभाग, स्टेट सीएसएसटी डे केअर, डेंटल युनिट आणि आकस्मिक विभाग तयार करण्यात येणार आहे. याशिवाय ऑन्को सर्जरी, मेडिकल ऑन्कोलॉजी, रेडिओथेरपी, अनेस्थेशिया आणि पेन मॅनेजमेंट विभागाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थान मोझरी येथील जनार्धन बोथे, तसेच नागपूरसह विदर्भातून गुरुदेव सेवामंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.