मुंबई, 20 जुलै (निसार अली) : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी स्वतःहून ट्विटर वरून ही माहिती दिली आहे. शेख हे मुंबईचे पालकमंत्री देखील आहेत.
कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. राज्यातील लोकांची सेवा करण्याचं कार्य घरातूनच सुरु ठेवणार आहे, असेही ते म्हणाले.
शेख हे ठाकरे सरकारमधील महत्वाचे मंत्री मानले जातात. ते वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सन 2009 पासून सलग तिसऱ्यांदा ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत आहेत.
दरम्यान, याआधी राज्य सरकारमधील तीन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. तिघांनीही कोरोनावर यशस्वीरित्या मात केली.