रत्नागिरी (आरकेजी) : सीए इन्स्टिट्यूच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातून सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाखेच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. मारुती मंदिर येथील जोगळेकर सभागृहात ही सभा झाली. या वेळी रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए भूषण मुळ्ये, उपाध्यक्ष श्रीरंग वैद्य, सचिव अँथोनी राजशेखर, कोषाध्यक्ष अभिजित चव्हाण, कार्यकारिणी सदस्य बिपीन शाह, सुमेध करमरकर व्यासपीठावर उपस्थित होते. सीए शैलेश काळे यांनी सूत्रसंचालन केले.
सीए इन्स्टिट्यूटचा सीए पदवीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. यातील मयुरेश जोशी, अनिरुद्ध पोतदार, फरहिन काझी, समृद्धी पाटणकर, प्रियांका सुराणा, हितेश जैन, रश्मी जॉयसर व डिसामध्ये भारतात प्रथम आलेल्या अक्षय जोशी या सर्वांना भेटवस्तू व गुलाब पुष्परोपटे देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. येथे सीए इन्स्टिट्यूट शाखा सुरू झाल्याने त्याचा फायदा सीए कोर्सच्या विद्यार्थ्यांना होत आहे. शाखेतर्फे स्टडी मटेरियल व पुस्तके, अभ्यासिका व ग्रंथालय आदींची सोय केली जात असल्याचे अध्यक्ष मुळ्ये यांनी सांगितले.
सीए राजशेखर यांनी शाखेच्या विविध कामकाजाची माहिती दिली. या कार्यक्रमास जिल्ह्यातील अनेक नामवंत सीए उपस्थित होते. नव्याने आलेला वस्तू व सेवा कर, तसेच कायद्यात होणार्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सीए विद्यार्थ्यांनी सज्ज व्हावे, असे आवाहन या वेळी मान्यवरांनी आपल्या भाषणात केले.