डोंगरी ते दुबई या पुस्तकाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर लेखक एस.हुसेन जैदी यांनी भायखळा ते बँकॉक लिहिले. हे पुस्तकही वाचकांनी उचलून धरले. मराठी भाषक गँगस्टरचा खराखुरा कुप्रसिद्ध प्रवास यात शब्दबद्ध करण्यात आला आहे.
मंजुळ पब्लिकेशन हाऊसच्या भायखळा ते बँकॉक इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद उज्वला बर्वे यांनी केला आहे. डोंगरी ते दुबईत कुख्यात दाऊद आणि त्याच्या पूर्वसूरींची माहिती वाचकांना होते. तरीही त्यात मुंबईच्या मराठी भाषक गुंडांचा उल्लेख हा अभावानेच येतो.
स्वतः लेखक इथे नमूद करताना म्हणतात की, मुंबई माफियाची कथा स्थानिक मुलांच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे, म्हणूनच भायखळा ते बँकॉक लिहून कथा पूर्ण करण्यात आली आहे.
गिरणी कामगारांचा संप, देशोधडीला लागलेली कुटुंब आणि यापैकी काही कुटुंबातील मुलांनी घेतलेला टोळ्यांचा आधार याचाही उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे. एखादी गॅंग करिअर म्हणून निवडावी आणि त्यात निपुणता मिळवून लीडर बनावे, अशी कल्पनाशक्ती पलीकडील बाब पुस्तक वाचताना आश्चर्याचा धक्का देत राहते.
पुस्तकात अमर नाईक, अश्विन नाईक हे दोन सख्खे भाऊ, अरुण गवळी, छोटा राजन, या कुख्यात माफियांवर प्रामुख्याने प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
अमर नाईक आणि अश्विन नाईक –
भाजीपाल्याच्या धंद्यात पोट्या गॅंगकडून होणारी घुसमट अमर नाईकने नुसती सहन केली नाही तर त्याला आव्हान सुद्धा तितक्याच क्षमतेने दिले. त्याला साथ मिळाली ती त्याच्या छोट्या भावाची (अश्विन नाईक). कुटुंबियांच्या सुरक्षतेविषयीच्या अस्थिरतेतूनच अमर – ‘गँगस्टर अमर नाईक’ झाला.
ड्रग डीलिंग, स्मगलिंग, अवैध शस्त्रसाठा, खंडणी या आणि अशा अनेक काळ्या धंद्यात अमर नाईकला गती मिळाली.
B.R.A गॅंग –
आई आणि वडील दोघे मिलकामगार असलेल्या अरुण गुलाब गवळीने आपले मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले होते. इतकेच काय महालक्ष्मी च्या शक्ती मिल मध्ये काही काळ काम केल्या नंतर विक्रोळीच्या गोदरेज बॉयज मध्ये अरुण ने नोकरी पत्करली होती. १९७७ मध्ये त्याने कांजूरमार्ग मधील क्रॉम्प्टन ग्रीव्हस मध्ये नोकरी धरली. इथेच त्याची ओळख सदाशिव पावले उर्फ सदामामा शी झाली. इथूनच अरुण गुन्हेगारीच्या विश्वात डोकवायला लागला. पुढे त्याची ओळख त्याच्या सोबत शाळेत शिकलेल्या बालमित्राशी – रमा नाईक शी झाली. रमा च्या तक्रारींचा सूर न संपणारच होता. शाळा सोडून रमा ने त्याच्या सारख्यांची कास धरली, ज्यात छोटा बाबू, बाबल्या सावंत, विलास चौघुले ही नावे आघाडीवर होती. बाबू रेशीम हा B.R.A गॅंग चा म्होरक्या होता. अरुण आणि रमा दोघेही रेशीमच्या सल्ल्याशिवाय निर्णय घेत नव्हती.
छोटा राजन –
मिथुन चक्रवर्तीच्या सिनेमांची तिकिटे ब्लॅक मध्ये चढ्या भावाला विकून धन्यता मानणाऱ्या राजेंद्र निकाळजे ला चेंबूर टिळक नगरातील सहकार सिनेमागृहात पैसे कमावण्याचं एक साधन मिळाले होतं. सिनेमागृहा बाहेर झालेल्या पोलीस लाठीहल्ल्यातून फिल्मी स्टाईलने राजेंद्र निकाळजे ने गुन्हेगारी विश्वाची सुरुवात केली. पोलिसाची लाठी हातातून हिसकावून त्यांच्याशी दोन हात करणारा राजेंद्र निकाळजे पूढे छोटा राजन या नावाने कुप्रसिद्ध झाला.
भायखळा ते बँकॉक पुस्तकाच्या पानापानावर थरार अनुभवायला मिळतो. माफियांच्या घरची परिस्थिती, त्यांचा अंडरवर्ल्ड प्रवेश वाचकाला सुन्न करतं. आज २०१७ मध्ये आपल्याला परप्रांतीय वादाचा मुद्दा विखारी होतं जाताना दिसला तरी त्याची पाळेमुळे ही गुन्हेगारी विश्वात रुजली आहेत हे वाचून थक्क व्हायला होतं. अरुण गवळी आणि मोहन सरमळकर गँगमध्ये ही परप्रांतीय वादाची ठिणगी त्याच्या गँगच्या नावावरून पडली. सरमळकर गॅंग च नाव होतं – ‘s – ब्रिज गॅंग. सरमळकर ला त्याचा दबदबा s – ब्रिज च्या पलीकडे घेऊन जायचा होता,तेव्हा त्याने त्याच्या गॅंग च नामकरण केला – ‘भायखळा गॅंग’. हे गवळी गॅंग ला मान्य नव्हता, या वादातूनच हल्ला-प्रतिहल्ला व्हायला लागला.
पुढे वर्चस्वाच्या युद्धात D गॅंग कडून अश्विन नाईक वर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर झालेला बेछूट गोळीबार झाला. गवळी गॅंग कडून दाऊद चा हस्तक सतीश राजे ची माजगाव-नागपाडा जंकशनला बुलेटप्रूफ गाडीची काच हातोड्याने फोडून, ९ गोळ्या घालून हत्या झाली. विजय उतेकर करवी छोटा राजनने बाबू रेशीमला ठार मारले. तुरुंगात ग्रेनेडचा हल्ला करून उतेकर रेशीमवर ३ गोळ्या झाडून थांबला नाही, तर तो मेल्यावर सुद्धा त्याच्या मृतदेहावर तो हातोड्याने एकामागून एक वार करत राहिला. त्याच्या रागाची परिसीमा आणि त्यापाठीमागची कारणे सविस्तरपणे पुस्तकात वाचायला मिळते.
८० च्या दशकात रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर घडून येत नव्हती. कनिष्ठ मध्यम वर्गीय कुटुंबियांसाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा आणि रोजगाराचा पेचप्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा पैशाच्या संधी सिनेमाची तिकिटे ब्लॅक मध्ये विकून मिळू लागली. पुढे B.R.A. गॅंग ने त्यांचा वाढत जाणारा दबदबा लक्षात घेऊन नवनवीन पोरं गँगमध्ये भरती केली. २०० पेक्षा जास्त तरुण गवळी गॅंग मध्ये भरती झाले. रमा नाईक आणि अरुण गवळीने शक्कल लढवून तरुणांना हॉटेल, दुकाने, ऑफिसेस मध्ये पाठवायला सुरुवात केली. जसा व्यवसाय-जशी कमाई तसा हफ्ता ही पोरे मागू लागली. १०० रु ते १००० रुपयापर्यंत हा हफ्ता गोळा केला जाऊ लागला. जो द्यायला नकार देत असे त्याला योग्य तो धडा शिकवला जात असे.
१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर ज्या घटना आकाराला आल्या त्यातील सर्वात महत्वाची घटना म्हणजे – मुंबई बॉम्ब ब्लास्ट. विघातक – अमानवी कृत्याने अंडरवर्ल्ड ची पाक पुरस्कृत दहशतवादाशी गळाभेट समोर आली आणि मुंबईच्या माफियामध्येही विभागणी झाली. यातूनच पुढे छोटा राजन दाऊद गॅंग पासून वेगळा झाला आणि मुंबईत रक्तरंजित युद्ध खेळले गेले
भायखळा ते बँकॉक ही कथा भायखळा-परळ-लालबाग पूर्व उपनगरे, तेथील गँगस्टर, त्यांच्यातील चढाओढ यांची कथा आहे. ज्यात मैत्री आहे, विश्वासघात आहे, व्यवसाय वाढविण्यासाठी ज्या प्रमाणे परिश्रम करावे लागतात तेही यात आहेत. आपल्या सुपीक मेंदूचा वापर माफियांनी भलत्याच कारणासाठी केला, हे वाचून थक्क व्हायलाच होते.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर, रवींद्र आंग्रे, प्रदीप शर्मा या बहादूर पोलीस अधिकारांच्या अतुलनीय शौर्याचा उजाळा भायखळा ते बँकॉक मधून वाचकाला होतो. मुंबई पोलिसानी गुन्हेगारी विश्वाचा कणा मोडताना एन्काऊंटर अस्त्र कसं मारक ठरले याचाही उल्लेख पुस्तकात आहे.
मुंबईवर असलेले माफियांचे राज्य, टोळीयुद्ध, एकमेकांविरुद्ध बदला करण्यासाठी कोणत्याही थराला जाणे, पोलिसांशी सामना यामुळे हे पुस्तक रंजक बनले आहे.