मालाड, (निसार अली) : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि रक्षणाचा प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्त भायखळ्यातील राखी बाजार निरनिराळ्या आणि मनमोहक राख्यांनी सजलेला आहे. लहानापासून ते मोठ्यांसाठी विशिष्ट प्रकारच्या राख्या बाजारामध्ये दाखल झाल्या आहेत. यंदा मागणी वाढली असून राख्यांच्या किमतींमध्ये 20 ते 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. बाजारामध्ये 5 रुपयापासून ते 250 रुपयापर्यंत राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. भायखळ्यातील होलसेल राखी बाजार हा अत्यंत प्रसिद्ध असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ग्राहक इथे राखी खरेदी करण्यासाठी येत असतात. लहान मुलांसाठी तेथे सध्या फेमस असलेल्या शक्तिमान, बाहुबली, बाल गणेश, छोटा भीम, हनुमान, वर्ल्ड कप, मिकी माउस आणि लाईटच्या राख्या या सारख्या अनेक प्रकारच्या राख्या येथे उपलब्ध असून त्यांना प्रचंड मागणी आहे. तसेच होलसेल बाजार असल्यामुळे राख्यांची किमत फार कमी आहे.
बाजारामध्ये जरीची राखी, चंदन राखी, मोती राखी आणि नाण्याची राखी या नवीन प्रकारच्या राख्या मोठ्या प्रमाणत दिसत असून या राख्यांची मागणी वाढली आहे. त्यांची किमत 40 ते 70 रुपयांपर्यंत आहे. चंदन राख्यांवर विविध नक्षीकाम केलेल्या राख्या कलकत्ता येथील काही भागातून मुंबईत मागवल्या जातात. तसेच जरीची राखी बंगालमधून मागवली जात असून सध्या ग्राहकांचे खास आकर्षण ठरले आहे. या राख्याची किमत 60 रुपये इतकी आहे.
तसेच बाजारामध्ये गोंड्याच्या राख्या, राम राख्या, फुलांच्या राख्या, स्टीलच्या राख्या या पारंपरिक आणि विविध जुन्या प्रकारच्या राख्या आजही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. बाजारात वेगळ्या सुवर्ण राखी आल्या असून या राखीवर गणेश, लक्ष्मी देवतेचे फोटो आहेत. सुवर्ण रंग दिल्यामुळे या राख्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. राख्यांची होलसेल किमत 80 ते 250 रुपयापर्यंत आहे.
भायखळ्यात राखी बनवणे हा फार पूर्वी पासून येथील स्थानिक नागरिकांचा व्यवसाय आहे. येथे वर्षाचे 12 हि महिने राखी बनवण्याचे काम सुरू असते. खेळण्याची राखी आणि विविध रंगाच्या गोंड्याच्या राख्याना बाजारात मोठ्या प्रमाणत मागणी असून येथील बनवलेल्या राख्या अनेक राज्यामध्ये कुरियरने, रेल्वेने आणि पोस्टाने सुद्धा पाठवल्या जातात. पुढील काही दिवसात राख्यांना फार मागणी वाढेल, अशी माहिती राख्याचे स्थानिक होलसेल विक्रेते देत आहेत.