मराठी सिनेसृष्टीतील मल्टीस्टार्सना एकत्र आणणारा ‘बसस्टॉप’ हा सिनेमा २१ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. आजचे तरुण कलाकार आणि ज्येष्ठ अनुभवी कलावंतांच्या ताफ्यात बनलेला हा सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानीच ठरणार आहे. गणराज असोशिएट्स प्रस्तुत आणि मराठी रॅपर श्रेयश जाधव निर्मित तसेच समीर हेमंत जोशी दिग्दर्शित ह्या सिनेमाचे नुकतेच धम्माल, मस्तीत म्युजिक लॉंच करण्यात आले.नवीन फ्रेश चेहऱ्यांच्या ‘बसस्टॉप’ या सिनेमातील गाणी रसिकांचा मूडदेखील फ्रेश करून टाकतात. या सिनेमातील ‘मूव्ह ऑन’, ‘आपला रोमान्स’, घोका नाही तर होईल धोका’ आणि ‘तुझ्या सावलीला’ ही गाणी तरुणाईला भुरळ घालणारी आहेत.
विशेष म्हणजे या गाण्याला ह्रीषिकेश-सौरभ-जसराज आणि आदित्य बेडेकर या नव्या दमाच्या संगीतकारांनी संगीत दिले असल्यामुळे, ही सर्व गाणी तरुण पिढीला आपलीसी वाटतील अशी झाली आहेत. ह्रीषिकेश -सौरभ-जसराज या त्रिकुटांनी संगीतबद्ध केलेले ‘मूव्ह ऑन’ हे गाणे वैभव जोशी यांनी लिहिले असून, रोहित राऊत आणि प्रियांका बर्वे या जोडीने ते गायले आहे. तसेच, क्षितीज पटवर्धन लिखित आणि श्रुती आठवले व जसराज जोशीच्या आवाजातले ‘आपला रोमान्स’ हे गाणे देखील तरुणाईच्या गळ्यातले ताईत बनले आहे. आदित्य बेडेकरने संगीत दिग्दर्शित केलेले योगेश दामले लिखित ‘तुझ्या सावलीला’ आणि ‘घोका नाहीतर होईल धोका’ ही गाणीदेखील तुफान गाजत आहे. ज्यात रुपाली मोघे आणि सागर फडके या जोडीने ‘तुझ्या सावलीला’ या गाण्याला स्वरसाज चढवला असून, सागर फडके याच्या अवाजातील ‘घोका…’ हे गाणे अधिकच प्रभावशाली झाले आहे.
अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे, अशी तगडी स्टारकास्ट यात पाहायला मिळणार असून, अविनाश नारकर, संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी ह्या ज्येष्ठ कलाकारांचीदेखील यात प्रमुख भूमिका आहे. स्टारकास्टच्या जल्लोषपूर्ण वातावरणात लॉंच करण्यात आलेल्या या कार्यक्रमात, चित्रपटाचा ट्रेलरदेखील रसिकांना दाखविण्यात आला. ह्या ट्रेलरमध्ये दोन पिढ्यांचे वैचारिक मतभेद आणि आपुलकी, अधोरेखित करण्यात आली असल्यामुळे, हा सिनेमा निव्वळ धम्माल, मस्ती नव्हे तर नात्याची भावनिक गुंफणदेखील लोकांसमोर सादर करणार आहे. आजच्या पिढीचा आणि त्यांच्या पालकांवर भाष्य करणाऱ्या ‘बसस्टॉप’ या सिनेमाच्या दर्जेदार निर्मितीसाठी श्रेयश जाधवसोबत पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी यां तिघांनीदेखील महत्वाची भूमिका निभावली आहे. नव्या सोबत जुन्याची फोडणी असलेला हा खुशखुशीत सिनेमा, यंदाचा मान्सून गाजवणार, असे भाकीत केल्यास वावगे ठरणार नाही.