
मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी वसाहत म्हणून विक्रोळीच्या कन्नमवार नगरची ओळख आहे. या ठिकाणी मोठी कामगार वस्ती आहेत. या भागातून थेट दादरला जाणारी 354 ही एकमेव बेस्ट बस होती. 40 वर्षाहून जुना असणारा हा मार्ग बेस्ट प्रशासनाने अचानक बदलला. या नव्या मार्गाला भारतीय जनता पक्षाने विरोध केला आहे. जुन्या मार्गाला मोठी मागणी असतानादेखील तो बदलण्यात आला आहे. मार्ग पूर्ववत करावा यासाठी आज भारतीय जनता पक्षाने माजी आमदार मंगेश सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रथमेश राणे व केतकी सांगळे यांच्या नेतृत्वाखाली आज सह्यांची मोहीम कन्नमवार नगर जनता मार्केट येथे राबविली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

बसला चांगला प्रतिसाद असताना चुकीचं सर्वेक्षण करून ही बस वडाळा आगारपर्यंत करण्यात आली. यामुळे या भागातील नागरिक संतप्त झाले आहेत. जर आता दादरला जायचे झाले तर दोन बस बदलाव्या लागतात. या ठिकाणी अनेक वर्षापासून ही बस सेवा सुरू होती. मात्र काहीही कारण नसताना 354 या बसचा मार्ग बदलण्यात आला आहे. हा मार्ग पुन्हा सुरू व्हावा यासाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे सह्यांची मोहीम राबवण्यात आली. जर ही सेवा काही दिवसात पूर्ववत केली नाही तर जोरदार आंदोलन करू, असा इशाराही भारतीय जनता पक्षातर्फे देण्यात आला आहे.
कन्नमवार नगर येथून 354 ही बस थेट छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे जात होती. यामुळे या भागातील लोकांना दादर रेल्वे स्टेशन, छत्रपती शिवाजी पार्क, चैत्यभूमी, दादर मार्केट, शिवाजी मंदीर नाट्यगृह, यशवंत नाट्य मंदिर, प्लाझा सिनेमागृह, सिद्धिविनायक मंदिर, सिटीलाईट सिनेमागृह, शीतलादेवी मंदिर आदी ठिकाणांपर्यंत जाता येत होते. मात्र गेल्या एक महिन्यापासून या बसचा मार्ग बदलण्यात आला. यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. यासाठी आज भारतीय जनता पक्षातर्फे सह्यांची मोहीम घेण्यात आली आली होती. मार्ग पूर्ववत केला नाही तर जोरदार आंदोलन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार मंगेश सांगळे यांनी दिला आहे.