मुंबई, (विशेष प्रतिनिधी): घाटकोपर येथे पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे चार मजली इमारत आज सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी कोसळली. या दुर्घटनेत १२ बळी गेले आहेत, जखमींचा आकडा अद्यापही स्पष्ट झालेला नाही. घाटकोपर जंक्शनजवळ असणारी दामोदर पार्कमधील साई सिद्धी असे कोसळलेल्या इमारतीचे नाव आहे. इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्यात गुंतले आहेत.
साई सिद्धी सोसायटीची इमारत सुमारे 30 वर्ष जुनी इमारत होती. एकूण १२ खोल्या असलेल्या या इमारतीत ३० रहिवाशी राहत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इमारतीच्या तळ मजल्यावर शितप हॉस्पिटल होते . दोन महिन्यांपासून ते बंद ठेवून गेस्ट हाउस बांधण्याचे काम सुरू होते. त्या साठी इमारतीचे पिलर्स आतमधून तोडण्यात आले होते. या कामाला येथील इमारतीतील रहिवाशानी विरोध केला होता . मात्र, विरोध डावलून सुनील शितप या व्यक्तीने बांधकाम सुरूच ठेवले, असा आरोप करण्यात येत आहे.
दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच पालिका आयुक्तांनी या घटनेबाबत १५ दिवसांत अहवाल द्यावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.