रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन पर्यटकांना समुद्रात बुडताना वाचविण्यात जीवरक्षकांनी यश आलं आहे. बुधवारी (ता.२५) दु. १२.३० ते १.३० वा.च्या सुमारास दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये या दोघांना वाचवण्यात आले आहे. यामध्ये अहमदनगरवरून आलेल्या एका तरूणाचा तर वर्धा येथून आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद पोपट सोबळे (२२, रा. अहमदनगर) हा तरूण गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आला होता. दु़१२.३० वा.च्या सुमारास आंघोळीसाठी समुद्रात उतरला असताना, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. यावेळी येथील जीवरक्षकांनी त्याला वाचवले.
दुसरी घटना दु.१.३० वा.च्या सुमारास घडली. चांगदवे नथुजी बर्गे (४५, रा. वर्धा) हे पोलीस कर्मचारी गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आले होते. तेदेखील आंघोळीसाठी समुद्रात उतरले होते. मात्र, त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांना येथील जीवरक्षकांनी वाचवले.
दरम्यान, या दोन्ही घटनांमध्ये ग्रामपंचायत गणपतीपुळेचे जीवरक्षक अक्षय माने, रोहीत चव्हाण, अनिकेत राजवाडकर, उमेश म्हादे आणि दिनेश सुर्वे यांनी मोलाची कामगिरी बजावली.