
संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्ली : संसदेत सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा व्हायला हवी, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी व्यक्त केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी संसदेच्या बाहेर ते पत्रकारांशी बोलत होते. अधिवेशनाचा सर्वाधिक उपयोग जनहितासाठी व्हावा, त्यासाठी चर्चा व्हायला हवी, असे ते म्हणाले. सभागृहातील कामकाज स्थगित होऊ नये, यासाठी मागील काही दिवसांत आम्ही सर्व राजकीय पक्षांशी व्यक्तिगत चर्चा केली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
पहिल्यांदाच अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होत आहे. आपल्या देशात पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी ५ वाजता सादर होत असे. जेव्हा अटलजींचे सरकार होते, तेव्हापासून या वेळेत बदल करुन सकाळी सदनाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर ताबडतोब अर्थसंकल्प सादर व्हायला लागला, असे ते म्हणाले.
आज आणखी एक नवी परंपरा सुरू होत आहे. अर्थसंकल्प एक महिना आधी सादर होत आहे आणि दुसरे म्हणजे रेल्वे अर्थसंकल्पही त्याच्याशी जोडला गेला आहे. सभागृहात यावर व्यापक चर्चा होईल आणि त्यामुळे आगामी काळात काय फायदा होईल, हे देखील समोर येईल, असे मोदी यांनी सांगितले. चांगल्या चर्चेबरोबरच जनहिताच्या कामांनाही पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सभागृहाचा उत्तम उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.