रत्नागिरी : महाराष्ट्राचा २०१७-१८ या वर्षीचा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात कोकणच्या वाट्याला विशेषकरून रत्नागिरी तालुक्याला झुकते माप देत सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. काही दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधी, स्थानिकांना डावलून जिल्हा प्रशासनाने केलेल्या गणपतीपुळेच्या ८० कोटींच्या विकास आराखड्याची आमदार उदय सामंत यांनी चिरफाड केली होती. ‘तीन वर्षांत जे झाले नाही, ते दहा दिवसांत मी करून दाखवतो,’ असे सांगत आमदार सामंत यांनी समाचार घेतला होता व त्याप्रमाणे सदर आराखड्यात बदल सुचवले होते. आमदार उदय सामंत यांनी सुचवल्याप्रमाणे ७९ कोटीच्या नवीन आराखडा मंजूर झाला असून, त्याला या अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे.
या सादर झालेल्या अर्थसंकल्पात रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेल्या निधीबाबत माहिती देतांना आमदार उदय सामंत यांनी सांगितले की, रत्नागिरीचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास व्हावा, यासाठी कातळशिल्प प्रस्ताव मंजूर झाला असून, त्याला २४ कोटी मंजूर झाले आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंधारे दुरुस्तीसाठी ६० कोटी मिळाले आहेत. कोकणातील फळफळावळ आंबा, काजू उत्पादन यांना प्रोत्साहन आणि त्यांच्या योजनांसाठी १०० कोटी, तर कुणबी समाजाच्या प्रलंबित मागणीनुसार शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला २५ कोटी निधी मिळाला आहे. कोकणातील सर्व रंगकर्मींच्या मागणीनुसार मच्िंंछद्र कांबळी यांच्या स्मारकासाठीची घोषणा या बजेटमध्ये करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नवीन पर्यटन स्थळ माचाळ विकसित करण्यासाठी देखील मंजुरी मिळाली. एकंदर रत्नागिरी जिल्ह्याला या बजेटमध्ये भरभरून मिळाले असून, स्थानिक आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नाने रत्नागिरी विधासभा मतदार संघाला सुमारे १०० कोटी रुपये मिळाले आहेत.