नवी दिल्ली : देशाला समृद्ध आणि प्रत्येक नागरिकांना समर्थ बनवणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे गरिबांना शक्ती मिळेल आणि युवकांना भविष्य मिळेल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर दिली. देशाच्या पहिल्या महिला अर्थ मंत्री निर्मला सितारमन आणि त्यांच्या चमूला या नागरिक स्नेही, विकास स्नेही आणि भविष्य केंद्रित अर्थसंकल्पासाठी खूप शुभेच्छा देतो, असेही ते म्हणाले.
या अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गाला प्रगती मिळेल आणि विकासाची गती आणखी जलद होईल. कर प्रणालीचे सरलीकरण होईल आणि पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण होईल हा अर्थसंकल्प उद्योजक आणि उद्योगांना मजबूत बनवेल आणि देशाच्या विकासातील महिलांची भागीदारी आणखी वाढवेल, असेही पंतप्रधान म्हणाले.
यामुळे शिक्षणाचा विकास होईल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश संशोधनाचे लाभ लोकांपर्यंत पोहोचेल. अर्थसंकल्पामध्ये आर्थिक जगासाठीच्या सुधारणा आहेत, सामान्य नागरिकांसाठी सुलभ जीवन आहे आणि त्याबरोबरच गाव आणि गरिबांचे कल्याणही आहे. हा एक हरित अर्थसंकल्प आहे त्यामध्ये पर्यावरण, वाहतूक आणि सौर उर्जा यावर विशेष भर दिला गेला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षात देशाने निराशाजनक वातावरणाला मागे सोडले आहे आणि देश आकांक्षांनी भरलेला आहे आत्मविश्वासाने भरलेला आहे. वीज, गॅस, रस्ते, घाण, भ्रष्टाचार, व्हीआयपी संस्कृती, सर्वसामान्यांची आपल्या हक्कासाठीची लढाई यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला यश मिळत आहे आज लोकांमध्ये खूप नव्या आकांक्षा आणि खूप अपेक्षा आहेत. हा बजेट जगाला विश्वास देत आहे की त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात त्यांना विश्वास मिळत आहे ते योग्य मार्गावर आहेत योग्य कृती करत आहेत त्यांची गती, योग्य आहे आणि त्यामुळे ते निश्चितच लक्ष प्राप्त करतील, असे पंतप्रधान म्हणाले.
हा संकल्प अशा विश्वास आणि आकांक्षांचा अर्थसंकल्प आहे जो एकविसाव्या शतकातील भारताच्या अपेक्षांना पूर्ण करून नवीन भारताच्या निर्मितीत एक महत्त्वाचा हिस्सा पार पाडेल. हा अर्थसंकल्प प्रकल्प 2002 साली आपल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षासाठी ठरवलेल्या संकल्पांना पूर्ण करेल. गेल्या पाच वर्षात आमच्या सरकारने गरीब, शेतकरी, अनुसूचित जाती, पीडित, शोषित आणि वंचितांना सशक्त करण्यासाठी त्वरित पावले उचलली. पुढील पाच वर्षांमध्ये त्यांचे सक्षमीकरण देशाला विकासाचे केंद्र बनवेल. पाच ट्रिलीयन डॉलर म्हणजे पाच लाख करोड डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची ऊर्जा देशाला या विकास केंद्रातून मिळेल. या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रातील संरचनात्मक सुधारणांसाठी नव्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 87 हजार कोटी रुपये हस्तांतरित झाले आहेत. मत्स्यव्यावसायिकांसाठी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना किंवा नॅशनल वेअरहौसिंग योजना या योजना 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करतील. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे गावांमध्ये रोजगाराच्या संधी वाढतील. जनशक्ती शिवाय जलसंचय शक्य नाही आणि जलसंचय हा जनआंदोलनाच्या भावनेतून होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
हा अर्थसंकल्प वर्तमानच नाही तर भावी पिढीच्या अडचणीसुद्धा लक्षात घेतो. स्वच्छ भारत मिशन प्रमाणेच हर घर जल अभियान सुद्धा देशाला संकटातून वाचण्यासाठी मदत करेल. या अर्थसंकल्पात घेतले गेलेले निर्णय आगामी दशकांमध्ये पाया मजबूत करण्याबरोबरच नव युवकांसाठी संधींची अनेक द्वारे उघडतील. हा अर्थसंकल्प तुमच्या अपेक्षा स्वप्ने आणि संकल्पांचा भारत बनवण्याच्या दिशेमध्ये एक ऐतिहासिक पाऊल आहे मी उद्या काशीमध्ये या विषयावर विस्तृतपणे बोलेल परंतु मी आता पुन्हा एकदा अर्थमंत्री आणि त्यांच्या पूर्ण टीमला खूप शुभेच्छा देतो, अशा भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.