वसई: ब्रेनडेड नागरिकाने यकृत व किडनी दान करून दोघांना जीवदान दिले. याबाबतची हकीगत अशी की, वसई येथे राहणारे गोपालन (वय ७८) १२ सप्टेंबरला मॉर्निंग वॉक करीत असताना त्यांना सायकलने धडक मारली. या धडकेत त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. वसईतील स्थानिक हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटमध्ये भरती करण्यात आले. वोक्हार्ट हॉस्पिटमध्ये आधुनिक वैद्यकीय चाचण्या केले असता येथील डॉक्टरांनी गोपालन यांना ब्रेन डेड घोषित केले. गोपालन यांच्या कुटुंबीयांनी १४ सप्टेंबरला ब्रेन डेड झालेल्या गोपालन यांचे अवयवदान करण्याचे ठरविले. १५ सप्टेंबर रोजी मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये प्रादेशिक प्रत्यारोपण समन्व्य केंद्राच्या मार्गदर्शनाखाली व प्रतीक्षायादीप्रमाणे वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये किडनी व यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. याविषयी अधिक माहिती देताना वोक्हार्ट हॉस्पिटलचे किडनी प्रत्यारोपण शल्य चिकित्सक डॉ. राजेश कुमार म्हणाले, ” ब्रेन डेडच्या रुग्णांमध्ये दोन्ही किडन्या दोन रुग्णांना देऊन त्यांचे प्राण वाचविता येतात परंतु गोपालन यांचे वय पाहता त्यांची त्यांच्या दोन्ही किडन्या या एकाच व्यक्तीला देण्यात आल्या. मालाड येथे राहणाऱ्या ५० वर्षीय (पुरुष ) रुग्णाला या किडन्या प्रत्यारोपण करण्यात आल्या असून आता त्यांची प्रकृती उत्तम असून नैसर्गीकरीत्या लघवीची प्रकिया सुरु झाली आहे. गेली ३ वर्षे ते डायलासिसवर होते.”
गोपालन यांचे यकृत प्रत्यारोपण करणारे वोक्हार्ट हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. अनुराग श्रीमल म्हणाले, ” गोपालन यांच्या वयाचा विचार करता त्यांचे यकृत चांगले कार्यरत होते. यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्या मुंबईतील एका ५६ वर्षीय ( पुरुष ) रुग्णावर यकृत प्रत्यारोपण करण्यात आले असून त्यांची प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे.”
आमच्या येथील असलेल्या अत्याधुनिक अवयव प्रत्यारोपण युनिट व अनुभवी प्रत्यारोपण शल्य चिकित्सक यांनी केलेल्या एकसंघ कार्यामुळे दोन्ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.सध्या कॅडेव्हर डोनेशनच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कुटुंबीयांची संमती अशा परिस्थितीत खूप महत्त्वाची असते, त्यामुळे अवयवदानाच्या जनजागृतीमुळे आणखी जीव आपल्याला वाचविता येतील. गोपालन यांच्या मुलाने व नातेवाईकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे अशी माहिती वोक्हार्ट हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख रवी हिरवाणी यांनी दिली.