रत्नागिरी (आरकेजी): राजापूर तालुक्यातील तुळसुंदे येथील नितीन देवकर यांच्या मालकीची महालक्ष्मी मच्छीमारी नौका सोसाट्याचा वारा आणि उसळत्या लाटांमुळे वेत्ये समुद्रात बुडाली. सुदैवाने यावेळी शेजारीच असणाऱ्या अन्य एका मच्छीमारी नौकेमुळे बुडणाऱ्या नौकेतील खलाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सोमवारी सकाळी ७ वा. च्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी, नितीन सहदेव देवकर(रा. तुळसुंदे ) यांच्या मालकीची महालक्ष्मी (आयएनडी/एमएच/४/एमएन/७८९ मच्छीमारी नौका असून या नौकेने ते मालवण ते रत्नागिरी असा मच्छीमारीचा व्यवसाय करतात. सोमवारी सकाळी ६ वा. देवकर हे मच्छीमासाठी तुळसुंदे बंदरातून व्येते समुद्रात केले होते. यावेळी नौकेवर जगदीश शांताराम शिरगावकर, पुरुषोत्त्तम म्हादु नाटेकर, कुंदन गणपत आडीवरेकर, भिकाजी रामचंद्र आडिवरेकर, संजय हरी पावसकर, राम हिराजी खडपे (सर्व रा. तुळसुंदे) असे ६ खलाशी होते. या नौकेबरोबरच अन्य नौकाही वेत्ये समुद्रात मच्छीमारी करत होत्या. त्यापैकी श्री कृपा ही मच्छीमारी नौका महालक्ष्मी नौकेच्या जवळच होती. महालक्ष्मी नौकेवर योगेश पांडुरंग सुर्वे,(रा. तुळसुंदे) हे तांडेल म्हणून काम करत होते. दरम्यान, सकाळी ७ वा. च्या सुमारास समुद्रात सोसाट्याचा वारा सुटून मोठ्या प्रमाणात लाटा उसळत होत्या. याचा तडाखा महालक्ष्मी नौकेला बसला. यामध्ये नौकेच्या तळाची फळी तुटून त्यामधून नौकेत पाणी शिरु लागले. त्यामुळे महालक्ष्मी नौका पाण्यात बुडू लागली. ही बाब लक्षात येतात महालक्ष्मी नौकेवरील खलाशांनी श्रीकृपा नौकेवरील तांडेल यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर श्रीकृपा नौका महालक्ष्मी नौकेच्या मदतीला धावून आली. नौका बुडत असताना महालक्ष्मी नौकेवरील सर्व खलाशी श्रीकृपा नौकेत सुखरुप उतरले. या घटनेनंतर काही वेळातच महालक्ष्मी नौकेला जलसमाधी मिळाली.