राऊत आणि त्यांच्या चेल्यांनी नारायण राणे व निलेश राणे यांच्या विरोधातील वाचाळपणा थांबवावा
रविंद्र नागरेकर यांचे खणखणीत प्रत्युत्तर
राजापूर, प्रतिनिधी :- मनुष्य आपल्या कार्यकर्तृत्वाने आपली पत सिध्द करतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना मुख्यमंत्री केलं ते त्यांचे शिक्षण बघून नव्हे तर त्यांचे संघटनेतील योगदान, प्रशासनाचा गाढा अभ्यास आणि उमेदी नेतृत्व आणि असामान्य कर्तव्य बघून. हे खासदार विनायक राऊत व त्यांच्या समर्थक चेल्यानी लक्षात घ्यावे. राणे साहेबांच्या शिक्षणावरून निरर्थक वाचाळपणा करू नये असा सज्जड ईशारा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र नागरेकर यांनी दिला आहे.
भाजपनेते खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार म्हटल्यावर मातोश्रीची पोपटपंची करणाºया खासदार विनायक राऊत आणि समर्थकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. त्यातूनच ते वाचाळपणा करीत आहेत. मोरे आणि बोरकर हे देखील त्यांचे पाळलेले पोपट आहेत. अशावेळी माजी खासदार निलेश राणे बोलतील तर काय आरती ओवाळतील का असा रोकडा सवाल नागरेकर यांनी विचारला आहे. आपल्या वडिलांविषयी कोणी बोललं तर तुम्ही गप्प बसाल का? मग निलेश राणेंचे कुठे चुकले. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून हमरातुमरीची भाषा केली जात आहे. राणे कुटुंबियांना धमकी सोडाच परंतु त्यांच्यावर बोलण्याचीसुध्दा हिंंमत कराल तर आम्ही मावळेच त्याचा समाचार घेवू असा टोला नागरेकर यांनी लगावला आहे.
खासदारकीच्या निवडणुकीत विनायक राऊत निवडून आल्याचे निलेश राणे यांना शल्य आहे असे म्हणतात. हे शल्य नाही तर विनायक राऊत यांची निवडुन येण्याची कोणतीही कुवत नाही ते निवडून आले आहेत ते भाजपाच्या मतांवर. त्यांनी राजीनामा देवून शिवसेनेच्या मतांवर निवडून आणून दाखवावे म्हणजे तुमची जागा लक्षात येईल.
त्यामुळे राऊत यांना कसे बोलायचे ते शिकवा. जि. प. सदस्या लक्ष्मी शिवलकर यांनी खासदार राऊत यांना आव्हान दिले होते. ते आव्हान आधी स्विकारा मग नारायण राणे, निलेश राणे यांना आव्हान द्या असा सल्लाही नागरेकर यांनी दिला आहे. रत्नागिरीत गेल्या दोन तीन वर्षात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. रस्त्यावर उतरण्याची भाषा केली गेली तेव्हा आम्ही रस्त्यावर उतरलो त्यावेळी हे चंगु मंगू कुठे होते असा सवाल नागरेकर यांनी केला. आम्ही कोणाला भीत नाही आणि उगाच कोणाच्या वाटेला जात नाही. परंतु कोणी विनाकारण अंगावर आला तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहायचं नाही हे आमच्या नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे बोलताना विचार करूनच बोला.
अतिवृष्टी झाली, चक्रवादळ झाली, अनेकांचे संसार उघडयावर आले तेव्हा स्वत:ला जनतेचे कैवारी म्हणविणारे खासदार आणि त्यांची चेलेमंडळी कुठे होते. केवळ मातोश्रीला खुष करण्यासाठी आमच्या नेत्यांविरोधात अर्वाच्य भाषा वापराल तर याद राखा असा परखड ईशारा नागरेकर यांसह भाजपा तालुका अध्यक्ष अभीजीत गुरव, महिला तालुकाध्यक्ष श्रृती ताम्हनकर, समीर खानविलकर, दिपक बेंद्रे, वसंत पाटील, रविकांत रूमडे, शहर अध्यक्ष विवेक गुरव, राजा खानविलकर, संजय ओगले, सिध्दार्थ जाधव यांनी दिला आहे.