रत्नागिरी : तालुक्यातील बहादूरशेख नाका येथील क्वाँँलिटी बेकरीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. आज (रविवार)सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या बेकरीचे बांधकाम अनधिकृत असून, हा स्फोट तसेच या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत बेकरी सुरु करण्यात येऊ नये अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रशासनाकडे केली आहे.
चिपळूण तालुक्यात क्वाँँलिटी बेकरी प्रख्यात आहे. या बेकरीच्या अनेक शाखा आहेत. त्यातीलच एक शाखा बहादूरशेख नाका येथे आहे. या बेकरीच्या आजूबाजूला दुकानं आहेत. त्यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. ज्या इमारतीमध्ये ही बेकरी आहे, त्या बेकरीच्या वरच्या मजल्यावर चिपळूण नागरी पतसंस्थेचे कार्यालय आहे. त्यामुळे अनेक लोकांची येथे नेहमी वर्दळ असते. त्यात आज रविवार त्यामुळे सकाळच्या वेळेत बेकरीत ग्राहकांची मोठी गर्दी होती. अशातच साडेनऊच्या सुमारास अचानक मोठा एक स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आणि ग्राहकांची धावपळ झाली. बेकरीतील बॉयलरचा स्फोट होऊन त्याचं झाकण आणि इतर वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. या स्फोटात महिलेसह एक कामगार जखमी झाले. त्यांना लगेचच रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दरम्यान या बेकरी मध्ये 8/9 भरलेले गॅस सिलेंडर होते. सुदैवाने हा स्फोट सिलेंडरचा नव्हता, नाहीतर पूर्ण इमारत भस्मसात झाली असती. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक पोळ तसेच तहसीलदार जीवन देसाई यांनी घटनास्थळी भेट दिली.
बेकरीच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह
या स्फोटामुळे बेकरीच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या बेकरीमध्ये कोणत्याही प्रकारचे फायर उपकरण नसल्याचं या स्फोटामुळे समोर आलं आहे. दरम्यान या बेकरीचे अतिरिक्त बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी केला आहे. त्यामुळे या स्फोटाची पूर्ण चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत बेकरी सुरू करू नये अशी मागणी प्रशांत यादव यांनी केली आहे. अशा प्रकारे नियम धाब्यावर बसवून बेकरी आणि हॉटेल चालवणाऱ्या सर्वांची चौकशी करावी अशी मागणी तहसीलदार जीवन देसाई यांच्याकडे प्रशांत यादव यांनी केली आहे.