रत्नागिरी, (आरकेजी) : बेरोजगार तरुणांवर लक्ष केंद्रित करून त्यांना फसवण्याचे काम रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे. सोशल मिडियाद्वारे रत्नागिरी रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये भरती आहे, असे पसरवून बोगस जाहिरातीतून तरुणांना फसवले जात असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, रत्नागिरी रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट सेंटर हे रत्नागिरीत अस्तित्वात नसल्याचेही उघड झाले आहे.
या डेव्हलपमेंट सेंटरमध्ये अनेक रिक्त जागा आहेत. त्या तातडीने भरायाच्या आहेत, असे संदेश व्हायरल केले जात आहेत. यात शिपाई आणि सिक्युरिटी गार्डला २३ हजाराचे वेतन दाखवण्यात आले आहे. या जागेसाठी अर्ज करताना एक बेवसाईट आणि एका बँकेचा अकाऊंट नंबर देण्यात आला आहे. विविध मागास प्रवर्गांपासून ते खुल्या जागांसाठी केवळ ५५० एवढी रक्कम या साठी या खात्यावर भरण्यास सांगण्यात आले आहे. अनेक तरुणांनी पैसेही भरले. एका सायबर कँफेतील मालकाच्या जागृकतेमुळे हि जाहिरात बोगस असल्याचे पुढे आलं.
५५० रुपये ही रक्कम कमी असल्याने या संदर्भात कुणी तक्रार देण्यासाठी आणि बोलण्यासाठी तयार नाहीत. ३१७ पदांसाठी हि भरती असल्याचे जाहिरातीत नमुद केले गेले आगे. आत तर या प्रकरणात भरती संदर्भात दिलेली वेबसाईटच बंद करण्यात आली आहे. तर सध्या बँकेचे खाते सुरु आहे. या प्रकरणाची दखल पोलिसांनीही घेतली आहे.
फसवणूक झालेल्या तरुणांनी पुढे येऊन तक्रार देण्याचे आवाहन जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांनी केले आहे.