रत्नागिरी, (आरकेजी) : ओखी वादळामुळे कोकण किनारपट्टीच्या आश्रयाला आलेल्या परराज्यातील बोटींच्यामागे त्यांचं सरकार ठामपणे उभं राहिलं आहे. केरळ आणि तमिळनाडूतल्या बोटींच्या मदतीला त्यांचं सरकार धावून आलं आहे.
ओखी वादळानं कोकण किनारपट्टीवर दाणादाण उडवून दिली. समुद्रात निर्माण झालेल्या वादळी स्थितीमुळे अनेक बोटी कोकण किनारपट्टीच्या आश्रयासाठी आल्या. केरळ आणि तामिळनाडू राज्यातील आलेल्या मच्छिमारी नौकांच्या मागे तिथलं राज्य सरकार ठाम पणे उभं रहताना पहायला मिळत आहे. केरळ सरकारकडून या परराज्यातील नौकांना परतीच्या प्रवासासाठी डिझेल पुरवण्यात आलं आहे. एका बोटीला ६०० लिटर डिझेलचा पुरवठा केला जात आहे. परराज्यातून १०७ बोटी सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बंदरात अडकून पडल्यात. केरळ आणि तामिळनाडूच्या बोटीसाठी डिझेलची तीन बॅरल पुरवण्यात आली आहेत. स्थानिक महसुल यंत्रणेकडे केरळ सरकारकडून यासाठीचा निधी पुरवला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष परवानगी घेवून या बोटींना डिझेलचा पुरवठा केला जातोय. पण परतीसाठी तब्बल १५०० लिटर डिझेलची या बोटींना आवश्यकता आहे. त्याशिवाय या बोटी परत आपल्या राज्यात परतू शकणार नाहीत. त्यामुळे सरकारी कोट्यातून मिळालेल्या डिझेलवर पाच दिवसांपासून अडकून पडलेल्या बोटीना परत जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.