मुंबई : अवैध बांधकामाला संरक्षण देणारे पालिकेचे सहाय्यक आयुक्त आता धास्तावले आहेत. त्याला कारणही तसे घडले आहे. अशा प्रकारच्या बांधकामाला पाठिशी घालणार्या एन विभागाचा सहाय्यक आयुक्त सुधांशु द्विवेदी यांना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सोमवारी निलंबित केले. मेहता यांच्या कारवाईमुळे अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणार्या सहाय्यक आयुक्तांना चाप बसला आहे. द्विवेदी यांच्याप्रकरणी उपायुक्त अशोक बर्डे यांनी चौकशी केली. त्यात तो दोषी आढळून आला.
घाटकोपर परिसरातील अवैध बांधकामाला संरक्षण दिल्याचा आरोप द्विवेदी यांच्यावर आहे. अवैध बांधकामांना संरक्षण दिल्यास संबंधित सहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री, पालिका आयुक्त यांनी दिला होता. अखेर कारवाई करण्यात आली.
घाटकोपर पूर्वेकडील बेकायदा बांधकामांना पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले, असा ठपका द्विवेदींवर ठेवण्यात आला आहे. शिवाय पुनर्विकास आणि दुरूस्तीसाठी परवानगी नसतानाही काही बांधकामांना परवानगी दिली. पालिका अधिनियम ३०४ नुसार रस्ते घोषित करायचे असतात. मात्र द्विवेदी यांनी त्यातही ‘घोळ’ केला आणि आयुक्तांना अपूरी माहिती दिली होती, असे चौकशीत आढळले आहे.