मुंबई : महापालिका शाळांबाबत जनमानसात असणारी प्रतिमा आता बदलणार आहे. खासगी शाळांच्या तोडीस तोड अशा शाळा मुंबई महापालिका आता उभारत आहे. पालिकेने शाळांची दुरुस्ती तसेच पुनर्बांधणीची कामे मोठय़ा प्रमाणात हाती घेतली आहेत. त्यापैकी परळ-भोईवाडा, कामाठीपुरा आणि एम. एच. बी. ७ या तीन पालिका शाळांची कामे पूर्ण झाली आहेत. या शाळा आकर्षक दिसण्यासाठी त्यांना खासगी स्वरुपाच्या धर्तीवर बनविण्यात आल्या आहेत. तसेच या शाळांचे स्वरुप कायम ठेवण्याकरीता दर तीन वर्षांनी शाळांची रंगरंगोटी करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी सांगितले.
येत्या शैक्षणिक वर्षांत पुन्हा एकदा आपल्याच शाळांमध्ये जाता येणार असल्याचा आनंद या शाळांमधून शिकणार्या विद्यार्थ्यांना होईल, असा आशावाद तीनही शाळांच्या पाहणीदरम्यान गुढेकर यांनी व्यक्त केला.
मागील आर्थिक वर्षांत एकूण ९८ शालेय इमारतींची ४११ कोटींची कामे हाती घेण्यात आली होती. यापैकी १९ कामे मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. शाळेच्या धोकादायक इमारती पाडून टाकल्यानंतर त्यांच्या पुनर्बांधणीला प्रचंड वेळ लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना दूरवरच्या शाळेत जावे लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होतो. तसेच शाळेच्या आजूबाजूच्या अनधिकृत झोपडय़ा हटवण्याची मागणीही गुढेकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
महानगरपालिकेने देशात पहिल्यांदा ‘व्हर्च्युअल क्लासरुम’द्वारे महापालिकेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण देणारी यंत्रणा राबविली आहे. महापालिकेच्या शाळा म्हणजे महापालिकेच्या शालेय इमारतीचा रोल मॉडेल असून भविष्यात सर्व शाळा ‘हायटेक’ करण्याबरोबरच शाळांमधील दर्जेदार शिक्षणाकरीताही पाठपुरावा करणार असल्याचे गुढेकर म्हणाल्या.