मुंबई : महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या गैरसोय होऊ नये, यासाठी रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
सहारिया म्हणाले की, आयोगाने ११ जानेवारी रोजी घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार महापालिका निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. त्यात रविवारी 29 रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असे नमूद केले होते. परंतु उमेदवारांच्या सोयीसाठी आता या रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील.
पहिल्या टप्प्यात मतदान होत असलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीत येणाऱ्या रविवारी २९ जानेवारी रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत, असे नमूद केले होते; परंतु आता या रविवारीदेखील नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांसाठी १ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. या कालावधीतील रविवारीसुद्धा (5 फेब्रुवारी 2017) नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत, अशी माहितीही सहारिया यांनी दिली.